खापा :- खापा स्थित जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ जन्मदिन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खापा शहरात विद्यालयाकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. शाळा समिती सदस्य शंकर गोखे, सीरोंजी येथील शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोंडे, निवृत्त प्राध्यापक पांडुरंग सुपारे, शेखर आवते, शाळा समिती सदस्य रमेश रोकडे यांच्याद्वारे जिजामाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सकाळी ठीक ८:३० ला महा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. स्वामी विवेकानंद जन्मदिन निमित्त शहरात भव्य मिरवणुक काढण्यात आलेली होती. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, बिरसा मुंडा, डॉक्टर आंबेडकर यासारख्या थोर पुरुषांची वेशभूषा धारण केलेली होती. राजमाता जिजाऊ जयंती व युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंदांचे विचार जन माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली सामाजिक बांधिलकी समजून महाविद्यालयाने ही भव्य रॅली काढलेली होती. यामध्ये वारकरी संप्रदायाचे प्रतीक म्हणून टाळ आणि मृदुंगाच्या तालावर दिंडीचे ही आयोजन करण्यात आलेले होते. हायस्कूल विभाग आणि महाविद्यालयीन विभागाची लेझीम पथके आकर्षणाचे केंद्र ठरलेले होते. युवा दिनी बँड पथक व लाऊड स्पीकर द्वारे जनजागृती घडून आणण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते. ही महा रॅली खापा शहरातील कॉपरेटिव बँक, बँक ऑफ बडोदा, भवानी माता मंदिर मार्गाने बाजार चौकातील गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून देना बँक मार्गे पोलीस स्टेशन, नवीन वस्ती , महाकवी सुधाकर गायधनी उद्यान मार्गे खापा माईन मधील बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विद्यालयात शेवटी अल्पोहार देऊन या महा रॅलीचे समारोप करण्यात आले. ही भव्य रॅली बघण्यासाठी खापा शहरात रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी जमलेली होती. युवा दिनाच्या या भव्य महारिलीच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक सुधाकर गजभिये, प्राध्यापक देवेंद्र धुंदे, राजेंद्र भोंगाडे, मुक्ता ठाकरे, उमेश चौरे, पंकज बावनकर, वर्षा सेलो कार, वंदना हांडे, भारती कुमरे, आनंद मेनकुदळे, दर्शना खुबाळकर, येनुरकर, रचना मोहने आदी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



