– आ. कृपाल तुमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण; हुतात्म्यांना अभिवादन
नागपूर :- महाराष्ट्र राज्य स्थापना दिन व कामगार दिनानिमित्त कळमेश्वर येथील तहसील कार्यालयात सकाळी ८ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार विकास बिक्कड होते. यावेळी नायब तहसीलदार संदीप तडसे, नगराध्यक्ष अविनाश माकोडे, मंडळ अधिकारी शरद बोरकर, हेमंत चिन्होरकर, संजय पुंसाडे, प्रविण शंभंरकर, केशव कुटे, शिवसेना तालुका प्रमुख बिरजू रघुवंशी, माजी युवासेना तालुका प्रमुख राजा धार्मिक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.![]()
कार्यक्रमादरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच कळमेश्वर तालुक्यात ‘नशा मुक्त रथ’ अंतर्गत व्यसनमुक्ती भारत अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना कृपाल तुमाने यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. “महाराष्ट्र दिन हा आपणा सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्राला अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत बनविण्यासाठी प्रयत्नशील राहूया,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रप्रेमाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.