– अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिला ‘भूकमुक्त महाराष्ट्र’चा नारा; गोदामील वस्तीत रेशन कार्डांसाठी विशेष कॅम्प सुरू
हंसराज, भंडारा :- “महाराष्ट्र राज्य भीकमुक्त आणि भूकमुक्त करणे हे राज्य अन्न आयोगाचे मुख्य ध्येय आहे. समाजात भीक मागणाऱ्यांच्या हातामध्ये ‘वाटी’ देण्याऐवजी ‘पाटी’ दिली, तरच त्यांचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होईल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी केले. आपल्या तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्याच्या सांगता प्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ढवळे म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री यांच्या थेट सूचना आहेत की, राज्यातील कोणताही नागरिक, मग तो भूमिहीन असो, मजूर असो वा स्थलांतरित, तो उपाशी झोपता कामा नये. अन्नाचा अधिकार हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. जे लोक सार्वजनिक ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्यांना ‘शिवभोजन’ योजनेशी जोडून देण्याचे काम प्रशासन करत आहे.”
शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी केंद्र व राज्य
सरकारच्या विविध योजना आहेत. ‘मातृवंदना’ योजनेद्वारे गरोदर मातांना प्रसूतीपर्यंत ठराविक टप्प्यात आर्थिक मदत दिली जाते. अंगणवाडीच्या माध्यमातून ताजा गरम आहार किंवा कच्चा शिधा पुरवला जातो. अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ५ किलो, तर अंत्योदय योजनेतील कुटुंबांना ३५ किलो धान्य दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
तीन दिवसांचा आढावा दौरा अध्यक्ष महेश ढवळे यांनी गेल्या तीन दिवसांत जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अन्न नागरी पुरवठा, शालेय पोषण आहार आणि आयसीडीएस (ICDS) या तीन मुख्य विभागांची बैठक पार पडली. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटी दिल्या. यामध्ये ४ शाळा, २ अंगणवाड्या आणि काही लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गोदामील वस्तीत तातडीची कारवाई दौऱ्यादरम्यान ढवळे यांना ‘गोदामील’ येथील वस्तीत काही त्रुटी आढळल्या. येथील अनेक नागरिक ‘प्राधान्य कुटुंब’ योजनेचे लाभार्थी होते, परंतु त्यांची परिस्थिती पाहता ते ‘अंत्योदय’ योजनेसाठी पात्र असल्याचे निदर्शनास आले. या नागरिकांना तातडीने अंत्योदय रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आजपासूनच गोदामील वस्तीत विशेष कॅम्प सुरू करण्यात आला असून लाभार्थ्यांची नोंदणी केली जात आहे.जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना हक्काचे रेशन कार्ड मिळेल.





