– हजारो भाविकांनी घेतले महादेवाचे दर्शन; भक्तीमय वातावरणात रंगला सोहळा
हंसराज,प्रतिनिधी भंडारा साकोली :- साकोली तालुक्यातील ‘स्मार्ट ग्राम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडेगाव (खांबा) येथील त्रिनेत्र महादेव भिमलकसा पाटिलदेव पहाडीवर महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. निसर्गरम्य पहाडीवर वसलेल्या या देवस्थानात शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
उत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महादेव आणि पार्वती यांच्या आकर्षक कोरीव मूर्तीला अभिषेक घालून करण्यात आली. यावेळी मूर्तीला हळदी-चंदन आणि उटणे लावून विधीवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वडेगावच्या सरपंच माधुरी गहाणे, बी.एम.आर.एफ.चे संस्थापक डॉ. सुरेश पंधरे, शामराव लांजेवार, भाऊराव लांजेवार, महिपाल राणे, प्रल्हाद कापगते, गिरीधारी रहांगडाले यांच्यासह गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आदल्या दिवशी रात्री मंदिरात भव्य जागरणाचे आयोजन करण्यात आले होते. ‘ओम नमः शिवाय’, ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या जयघोषाने आणि भजनाच्या सुरांनी संपूर्ण पहाडी परिसर दुमदुमून गेला होता. भाविक भक्तीत पूर्णपणे तल्लीन झाले होते. सायंकाळी पारंपरिक पद्धतीने ‘काला हंडी’ फोडण्यात आली आणि उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
या सोहळ्यासाठी वडेगावसह परिसरातील हजारो स्त्री-पुरुष भाविक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विठ्टल लांजेवार, देवराम डोमळे, सुनील राऊत, देवचंद ठाकरे आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.