spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी

– आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई :- राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर सुरू करावेत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

मुंबईतील “सुरुची” शासकीय निवासस्थानात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून जनआरोग्य योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे शासनाचे पैसे सरकारी रुग्णालयाला मिळतील. या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयाचे सक्षमीकरण होण्याबरोबरच डॉक्टरांनाही अधिक चांगला प्रोत्साहन भत्ता मिळेल. यापूर्वी जनआरोग्य योजनेशी संलग्नित झालेल्या रुग्णालयांचा गेल्या सहा महिन्यातील प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

न्यूरो, कॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देणे बाबत तसेच, PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांनी (District Coordinators) अधिक सक्रिय होऊन काम करावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात राहून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी क्षेत्रीय भेटी देऊन योग्य सनियंत्रण करावे. रुग्णालयांना मिळणाऱ्या कॉर्पस फंडचा विनियोग रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, औषध खरेदीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी खर्च कराव्यात. त्यासाठी एक समिती स्थापन करून, एसओपी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय रुग्णालयांनी स्वतःच्या पायावर उभे राहून दर्जेदार आरोग्य सेवा देणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी योजनेच्या माहिती देणाऱ्या टोल फ्री नंबर सर्वत्र प्रदर्शित करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

बैठकीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक पुणे डॉ. विजय कंदेवाड यांचेसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles