spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वीज क्षेत्रातील बदलती आव्हाने पेलण्यासाठी महावितरण सज्ज: तत्पर ग्राहकसेवा, महसूलवाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर

– संचालक धनंजय औंढेकर यांचा जनमित्रांशी थेट संवाद

नागपूर :- जागतिक पातळीवर वीज क्षेत्रात अत्यंत वेगाने आणि व्यापक प्रमाणात होणाऱ्या तांत्रिक बदलांची आव्हाने पेलण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून भविष्यातील विजेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी महावितरण पूर्णपणे सज्ज झाली आहे. बदलत्या काळासोबत कंपनीने स्वीकारलेले हे सकारात्मक व तंत्रस्नेही बदल आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे. या आधुनिक बदलांच्या माध्यमातून वीज ग्राहकांना अत्यंत तत्पर, पारदर्शक व दर्जेदार सेवा पुरवणे, कंपनीची महसूलवाढ साध्य करणे आणि शून्य थकबाकीचे ध्येय गाठणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी केले.

नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी आयोजित वरिष्ठ अधिकारी, अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भव्य सर्वसमावेशक आढावा बैठकीत जनमित्रांशी थेट संवाद साधताना ते बोलत होते. या आढावा बैठकीला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता अमित परांजपे (प्रादेशिक कार्यालय), संजय वाकडे (नागपूर ग्रामीण), प्रफुल लांडे (नागपूर शहर), दिपाली माडेलवार (इन्फ्रा), स्मीता पारखी (वर्धा) आणि वैभव पातोडे (चाचणी) यांच्यासह विविध विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संचालक धनंजय औंढेकर यांनी महावितरणचे धोरणात्मक मिशन आणि व्हिजन स्पष्ट करताना सांगितले की, सध्याच्या काळात स्मार्ट मीटर, छतावरील सौरऊर्जा (रुफटॉप सोलर), डिजिटलायझेशन आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे संपूर्ण वीज वितरण क्षेत्रात क्रांतिकारी आणि सकारात्मक परिवर्तन घडून येत आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या प्रत्यक्ष वीज वापराचे मोजमाप अधिक अचूक, जलद आणि पारदर्शक होणार आहे. या आधुनिक प्रणालीमुळे मिळणारे प्रत्यक्ष फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महावितरणच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी प्रत्यक्ष भेटून सुसंवाद साधावा आणि स्मार्ट मीटरबाबत जनमानसात असलेले गैरसमज दूर करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

त्यांनी पुढे नमूद केले की, भविष्यातील विजेची वाढती मागणी पर्यावरणपूरक मार्गाने पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे अनिवार्य झाले आहे. यासाठी केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ आणि ‘स्मार्ट सोलर योजने’चा प्रसार व प्रचार तळागाळातील ग्राहकांपर्यंत व्यापक स्तरावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात थेट बचत तर होईलच, शिवाय स्वच्छ व हरित ऊर्जेच्या वापराला मोठी गती मिळेल. भविष्यात दिवसभरात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी अतिरिक्त सौरऊर्जा रात्रीच्या वेळी वापरासाठी उपलब्ध व्हावी म्हणून बॅटरी स्टोरेज तंत्रज्ञान आणि हायड्रोजनसारख्या पर्यायी इंधनाचा वापर आगामी काळात अत्यंत निर्णायक ठरेल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

कंपनीच्या आर्थिक स्थैर्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मागील वर्षभरात महावितरणने राज्यभरात सुमारे 41 हजार वीजचोऱ्या उघडकीस आणल्या होत्या. मात्र, चालू वर्षाच्या अवघ्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल 50 हजारांहून अधिक वीजचोऱ्या उघडकीस आणून मोहिमेला अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. वीजचोरीविरुद्ध महावितरणची ही आक्रमक आणि धडक मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहील असा इशारा देत वीजचोरांवर सामाजिक वचक निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वीजचोरीचा हा प्रकार मुळापासून नष्ट करून वीज वितरण व्यवस्थेची तांत्रिक कार्यक्षमता वाढवणे आणि कंपनीच्या महसुलात भरीव वाढ करणे हे महावितरणचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने वीज क्षेत्रातील हे नवीन तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करून समर्पित भावनेने, जबाबदारीने आणि सांघिक कौशल्याने काम करण्याचे आश्वासन दिले. संचालक औंढेकर यांनी नागपूर परिमंडलाकडून व्यक्त केलेल्या सर्व अपेक्षा यशस्वीपणे पूर्ण केल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या बैठकीस नागपूर व वर्धा जिल्ह्यातील सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते अमित शिवलकर (नागपूर), प्रीती फुले (नागपूर शहर मंडल), शर्मिला इंगळे (वर्धा), संतोष क्षीरसागर (गांधीबाग), धम्मदीप फुलझले (सिव्हिल लाईन), राहुल जीवतोडे (काँग्रेसनगर), डॉ. गजानन जयस्वाल (महाल), प्रशांत टेंभेकर (बुटीबोरी), नरेश पारधी (वर्धा) आणि प्रदीप घोरुडे (हिंगणघाट) यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles