बाजारगाव :- नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथील प्रसिद्ध अनंततारा हॉटेलला गुरुवारी (ता. १२) रात्री भीषण आग लागली. आगीमुळे हॉटेलच्या खोल्यांमध्ये धुराचे लोट पसरले. याच धुरामुळे खोलीत अडकलेल्या एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. मनोज सदाशिवराव बांडे (वय ५८, रा. अंजनगावसुर्जी, जि. अमरावती) असे मृताचे नाव असून, ते अंजनगावसुर्जी तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होते. रात्री ७.३० ते ७.४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज बांडे हे अमरावतीहून नागपूरकडे जात होते. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास ते बाजारगाव येथील अनंतारा हॉटेलमध्ये थांबले. त्यांनी हॉटेलमधील २०८ क्रमांकाची खोली घेतली होती. रात्रीच्या सुमारास अचानक हॉटेलला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे हॉटेलमध्ये धुराचे लोट पसरले. खोलीत धूर साचल्याने बांडे यांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी सोलर कंपनीचे अग्निशमन दल आणि कोंढाळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. दोन्ही अग्निशमन दलांच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, मृत व्यक्तीच्या ओळखपत्रावरून मनोज बांडे यांची ओळख पटली. हॉटेलला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या भीषण आगीमागील कारणांचा शोध घेतला जात असून, ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढाळी पोलिस पुढील तपास करीत आहेत.






