बुटीबोरी नगरपरिषदेला गळती – जीर्ण इमारतीच्या दुरुस्तीची मागणी, मंदार वानखेडे यांचे निवेदन

0
47

 

संदीप बलवीर, नागपूर २९ : बुटीबोरी नगरपरिषदेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचली असून पावसाळ्यात छत आणि भिंतींना गळती लागल्याने प्रशासनाचे कामकाज धोक्यात आले आहे. त्यामुळे या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषदेचे माजी पाणीपुरवठा व मलनिस्सारण सभापती मंदार वानखेडे यांनी कार्यकारी अधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

स्व. किशोरभाऊ वानखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ युवकांच्या सांस्कृतिक विकासासाठी बांधण्यात आलेली ही इमारत जवळपास २५ वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहे. ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतर झाल्यानंतर नवीन वसाहतीतील या सांस्कृतिक भवनात नगरपरिषदेचे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून इमारतीच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले असून पावसाचे पाणी भिंती व स्लॅबमध्ये मुरल्यामुळे भिंतीतून गळती होते आहे आणि छताचे पोपडे पडत आहेत.

या जीर्ण अवस्थेमुळे प्रशासकीय कामकाज धोक्यात आले आहे. पाण्याच्या गळतीमुळे महत्त्वाची प्रशासकीय कागदपत्रे आणि संगणकासारखी विद्युत उपकरणे खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याहूनही गंभीर म्हणजे, छताचे पोपडे कोसळून कर्मचारी किंवा नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

“एकंदरीत इमारत अतिशय कमकुवत झाली असून ती कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करण्याची पावले उचलली नाहीत तर मोठा अनर्थ घडू शकतो,” असा इशारा मंदार वानखेडे यांनी निवेदनातून दिला आहे.