spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई :– रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका क्रीडा संकुलाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात येणार असून, माणगाव येथे अत्याधुनिक सुविधा असलेले उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येईल, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिकेत तटकरे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, २०२० च्या चक्रीवादळात तालुका क्रीडा संकुलाचे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय क्रीडा संकुलासाठी २४ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून, ८५ कोटी रुपयांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, खारघर येथे विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रस्तावामुळे हा विषय प्रलंबित राहिला. या कालावधीत माणगाव तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या कामाला गती देण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खारघर येथे विभागीय क्रीडा संकुल उभारले जात असले तरी माणगावमध्ये विशेष बाब म्हणून उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. या संकुलात स्विमिंग पूल, क्रिकेटसह विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माणगाव विभागीय क्रीडा संकुलासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. डोंगरी भागातील क्रीडा संकुलांच्या विकासासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच रत्नागिरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाचा विचार करून आवश्यक तरतूद करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.