spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ साडेतीन वर्षात पूर्ण करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची मंजुरी

· १८.४० किमी मार्गावर एकात्मिक उड्डाणपुलासह १२ उन्नत स्थानकांचा समावेश

· प्रकल्प खर्च १३ हजार ८५६.३७ कोटी रुपये अपेक्षित

मुंबई :- मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणाऱ्या १८.४० किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाईन १२ -अ ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. हा मार्ग पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.

मेट्रो मार्गिका १२ अ मुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढण्याबरोबरच कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमधील वाहतूक जोडणी अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच राज्यातील जी मेट्रोची कामे सुरू आहेत, त्या कामांचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटामार्गे) प्रस्तावित मेट्रो मार्गिका १२ अ या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. या मार्गिकेमुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के प्रवासवेळ वाचणे अपेक्षित असल्याचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.

असा आहे प्रकल्प

ही संपूर्ण मेट्रो मार्गिका उन्नत असून त्यावर १२ स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पात ६.९३ किलोमीटर लांबीचा चारपदरी आणि ८.६९ किलोमीटर लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूल समाविष्ट आहे. या मार्गिकेवर दररोज ४ लाख ७४ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.

काटई नाका येथे मेट्रो मार्गिका १२ व बुलेट ट्रेन जोडमार्ग, काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो मार्गिका १४ आणि अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ शी जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर फीडर बससेवाही प्रस्तावित आहे.

या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासासाठी लागणारा वेळ ४० ते ५० टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि विविध वाहतूक माध्यमांतील सुविधा वाढल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल. परिणामी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्यासह राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनता कमी होणे अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रवासाचा वेळ कमी करणे, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही उद्दिष्ट्ये या प्रकल्पामुळे साध्य होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. मेट्रो मार्गिका आणि एकात्मिक उड्डाणपुलाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचासही यावेळी मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमिनी प्रकल्प विकास व निधी उभारणीसाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.

Popular Articles