spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“मारबत महोत्सवाला” प्रारंभ

– राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते काळी व पिवळी मारबतची विधिवत पूजा

नागपूर :- नागपूरची पारंपारिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या ‘मारबत महोत्सवाला’ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नशील असून, मारबत महोत्सवाला रविवार (ता.०६) पासून प्रारंभ झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भाविकांची श्रद्धा असलेल्या काळी व पिवळी मारबत यांची विधिवत पूजा करण्यात आली. मारबत महोत्सव येत्या शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी आयोजित केले जाणार आहे.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त डॉ. विपीन, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड, विधी विशेष समिती सभापती  निधी तेलगोटे, ज्येष्ठ नगरसेवक आभा पांडे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, गांधीबाग झोन सभापती उमा देशमुख, मनपाचे अतिरिक्त आयुक्त  अंकित, अपर पोलीस आयुक्त विनीता साहू, पोलिस उपायुक्त संदीप पाखले, पोलिस उपायुक्त राहुल माखनीकर, आदित्य मिरखेलकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, नगरसेवक तुषार लारोकर, रेखा निमजे, नगरसेविका चेतना निमजे, कल्पना शर्मा, स्वीटी भिसीकर, रामभाऊ आंबुलकर, संजय अवचट, हेमंत बरडे, श्रीकांत आगलावे, कल्पक भानारकर, सहायक आयुक्त हरीश राऊत, अनिकेत धोपट मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर उपस्थित होते. तदनंतर हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले.

जनतेचा सहभाग असणाऱ्या परंपरेचे जतन करणार : ॲड. आशिष शेलार

यावेळी बोलतांना ॲड. आशिष शेलार म्हणाले की, नागपूरच्या मारबत उत्सवाला १४५ वर्षांची प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. इडा, पिडा, अनिष्ट प्रथा,परंपरा, रोगराई घेऊन जागे मारबत असे म्हणत अनिष्ट गोष्टींना तीरांजली वहिल्या जाते, ही समाजासाठी उत्तम बाब आहे. मारबत सारख्या इतर उत्सवात ज्यात जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो अशा, पारंपारिक उत्सावांचे जतन, संवर्धन, प्रचार व प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

शहराची अनिष्ट व वाईट प्रवृत्ती घेऊन जा गे मारबत: महापौर निता ठाकरे

महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, “मारबत व बडग्या म्हणजे केवळ सण नसून समाजातील अनिष्ट, वाईट गोष्टी आणि संकटे दूर करून शहराला प्रगतीच्या अधिक उंचीवर घेऊन जाण्याचे हे प्रतीक आहे. पोलीस विभाग आणि महानगरपालिका उत्तम समन्वयाने काम करत असून, यंदाचा हा महोत्सव नागपूरच्या वैभवात भर घालणारा ठरत आहे.” समाजात वाईटाचा बिमोड करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आयोजनाचे विशेष प्रयत्न

दरवर्षीप्रमाणे यंदाही पिवळी मारबतचे आयोजन तऱ्हाने तेली समाज व काळी मारबतचे आयोजन काली मारबत उत्सव समितीच्या वतीने केले जात आहे. तर विशेष म्हणजे, महापौर निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांच्या देखरेखीत राष्टीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी मारबत व बडग्या महोत्सवाची तयारी केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून, विविध राष्ट्राचे प्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती व मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील सिनेअभिनेता, अभिनेत्री यांना विशेष आमंत्रित केले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्य मंत्री आशिष जैस्वाल यांच्यासह सर्व खासदार, आमदार यांना देखील आमंत्रित केले जात आहे.

विशेष सत्कार व हेरिटेज वॉक

मारबत महोत्सवाचे औचित्य साधून नागपूरच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचा प्रसार करण्यासाठी विशेष हेरिटेज वॉक काढण्यात आला. या हेरिटेज वॉकचे यशस्वी नेतृत्व व सहकार्य करणाऱ्या मंदिरा नेवारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, बाडग्यावर विशेष अभ्यास करून ‘आचार्य'(पीएचडी) पदवी प्राप्त केल्याबद्दल राहुल जांभूळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काळी मारबत मंदिरापासून या हेरीटेज वॉकची सुरुवात झाली. यावेळी सहभागी नागरिकांना काळी मारबतचे दर्शन तसेच तिचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर हेरिटेज वॉक दरम्यान पिवळी मारबतकडे जाताना आर्किटेक्ट मंदिरा नेवारे यांनी मार्गातील विविध ऐतिहासिक संदर्भ आणि मारबत परंपरेचा इतिहास सहभागी नागरिकांना समजावून सांगितला. पिवळी मारबत येथे पोहोचल्यानंतर तिचा इतिहास, परंपरा आणि मारबतला ओटी भरणे, पूजा करण्यामागील श्रद्धा व महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

मारबत मार्गाची पोलीस व मनपा प्रशासनाची संयुक्त पाहणी

नेहरूपुतळा चौक ते पिवळी मारबत चौक दरम्यानच्या मार्गाची महापौर श्रीमती निता ठाकरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व मनपा आयुक्त डॉ.विपीन यांच्या मार्गदर्शनात पोलीस व मनपा प्रशासनाने संयुक्त पाहणी केली.

मारबत पाहण्यासाठी कोणतेही तिकीट नाही

शिवानी दाणी वखरे यांनी स्पष्ट केले की, नागपूर महानगरपालिका मारबत पाहण्यासाठी कोणतेही तिकीट विक्री करत नाही. नागरिकांना मारबतच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाशी जोडण्यासाठी मनपाकडून जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. दरम्यान, मारबतच्या निमित्ताने ‘मारबत महोत्सवाचे’चे छायाचित्र/नाव मुद्रित असलेले टी-शर्ट आणि बँड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक नागरिकांना हे टी-शर्ट व बँड घेता येणार असून, हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. विशेष म्हणजे,टी-शर्ट अथवा बँड खरेदीचा मारबत पाहण्यासाठीच्या प्रवेशाशी कोणताही संबंध नाही. मारबत महोत्सव हा नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितींवर विश्वास न ठेवता, नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत माध्यमांवर उपलब्ध माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.