नागपूर :- नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असणारा ‘मारबत महोत्सव’ यंदा अत्यंत व्यापक आणि भव्य स्वरूपात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पिवळी मारबतचे आयोजन तऱ्हाने तेली समाज व काळी मारबतचे आयोजन काली मारबत उत्सव समितीच्या वतीने केले जात आहे. नागपूरच्या या ऐतिहासिक संस्कृतीला केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. महोत्सवाच्या अनुषंगाने मनपाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून, नागपूरच्या समृद्ध वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या दिशेने मनपा कटिबद्ध आहे.अशी माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिली. मारबत महोत्सवाचे आयोजन शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १२. वाजता गांधी पुतळा चौक येथे करण्यात येणार आहे,
महोत्सवाची सुरुवात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख हस्ते पिवळी व काळी मारबत यांची विधिवत पूजा करून झाली आहे. येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित मारबत महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मनपाच्या विभाग प्रमुखांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. शहराच्या विविध भागांत खालील प्रमुख चौकांमध्ये मारबत उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. मनपाचा मुख्य कार्यक्रम गांधीपुतळा चौक येथे होणार आहे. तर मनपाद्वारे स्वागत गेट, संपूर्ण महोत्सव मार्गाची सजावट, मारबतचे स्वागत, स्वागत मंच आदी व्यवस्था करण्यात येणार आहे.
मनपातर्फे स्वागत मंच
Ø पिवळी मारबत कुंभारपुरा चौक, गोळीबार चौक, भारत माता चौक, शहीद चौक व टांगा स्टँड चौक, गांधीपुतळा चौक (मुख्य कार्यक्रम स्थळ), कोतवाली चौक, मस्कासाथ छोटेलाल हलवाई समोर स्वागत मंच उभारण्यात येणार आहे
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती
१४५ वर्षांचे गौरवशाली ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या मारबत महोत्सवाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी मनपातर्फे विशेष नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, पालक मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री श्री. आशिष जैस्वाल तसेच परदेशातून वाणिज्य राजदूत (Consul General), विविध देशांचे प्रतिनिधी, इतर मानननीय मंत्री महोदय, सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते उपस्थित राहणार आहेत. यात फ्रान्स, इटली, फिनलंड, नॉर्वे यांच्या मा.वाणिज्य राजदूत यांचा समावेश आहे. तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, जय मेहता, सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ, आरती वेले, अकुश चौधरी,उमेश यादव संपादक निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विशेषः म्हणजे, नेहरू पुतळा चौकात मा.वाणिज्य राजदूत यांना मिलन बघता यावे याकरीत बिल्डींगवर व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण युसीएन वर केले जाणार आहे.





