spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्राध्यापकांच्या त्रासाला कंटाळून वैद्यकीय विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

 

गोंदिया १२ : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने प्राध्यापकांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानचा रहिवासी असलेल्या आवेश कुमार नावाच्या या तृतीय वर्षातील विद्यार्थ्याने गळफास लावून घेतला. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे महाविद्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आवेशने आपल्या सुसाईड नोटमध्ये महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रशांत बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने लिहिले आहे की, प्राध्यापक डॉ. बागडे यांनी त्याच्या आईबद्दल अपशब्द वापरले आणि त्याचा सतत मानसिक छळ केला. विद्यार्थ्यांच्या चुकांवर त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार शिक्षकांना आहे, पण त्यांच्या पालकांबद्दल वाईट बोलण्याचा त्यांना कोणताही हक्क नाही, असे आवेशने चिठ्ठीत नमूद केले आहे.

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आवेशला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, त्याची प्रकृती चिंताजनक आहे, तर महाविद्यालयाच्या प्रशासनाने मात्र त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे गोंदिया शहरात आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचे सांगितले आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच नेमका प्रकार समोर येईल. या घटनेने शिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. याआधीही याच महाविद्यालयात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

Popular Articles