खापा, वार्ताहर :- स्थानिक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेंभुरडोह येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंचफुला कैलाश वांगरुके असे मृतक महिलेचे नाव असून (वय ३४ वर्षे, रा. टेंभुरडोह, पो. बडेगाव, ता. सावनेर) येथील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान उघडकीस आली. घरी कोणीही नसताना पंचफुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घरातून एक सुसाईड नोट सापडली. त्यात पंचफुलाने तिच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या कोणाचेही नाव लिहिलेले नाही. पंचफुलाचा पती कैलाश वाघुके हा जेसीबी ऑपरेटर आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की पंचफुला मानसिकदृष्ट्या आजारी होती आणि मागील दोन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तिला ७ आणि ४ वर्षांच्या दोन मुली आहेत. खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात प्रकाश नांदुरकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह हितेश बनसोडच्या रुग्णवाहिकेतून सावनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. खापा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.




