spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विवाहाच्या बेडीतून अल्पवयीन मुलीची सुटका, पुन्हा शाळेत दाखल, बडेगावमध्ये प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

खापा :- खापा पोलीस स्टेशन हद्दीतील बडेगाव परिसरात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, जिल्हा प्रशासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शाळेतून बेपत्ता असलेल्या या मुलीला पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले असून, विवाहाच्या बेडीतून तिची मुक्तता करण्यात आली आहे.

जिल्हा बालरक्षण व पर्यायी शिक्षण समन्वयक प्रसेनजित गायकवाड यांना संबंधित मुलगी दीर्घकाळापासून शाळेत गैरहजर असल्याची आणि तिचा विवाह ठरल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा महिला व बालविकास विभाग, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त चमूने तातडीने शोधमोहीम राबवून ही कारवाई केली. प्रशासकीय चमूने मुलीच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली असता नातलगांमध्ये विवाहाची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे आणि लग्न ठरल्यापासून पालकांनी तिला शाळेत जाण्यापासून रोखल्याचे स्पष्ट झाले. यावेळी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून उपस्थित अधिकाऱ्यांनी पालकांशी सविस्तर चर्चा केली. बालविवाहामुळे मुलीच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम आणि या कायद्यांतर्गत होणाऱ्या कठोर शिक्षेची जाणीव करून देत पालकांचे प्रभावी समुपदेशन करण्यात आले. प्रशासनाच्या या भूमिकेनंतर पालकांनी आपली चूक मान्य केली असून, त्यांनी यापुढे मुलीला शिकवण्याचे मान्य करत तसे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. मुलीला तत्काळ शाळेत हजर करण्यात आले असून, तिच्या शालेय शिक्षणाची पुन्हा सुरुवात झाली आहे.

“विशेष जनजागृती”

या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेत विशेष जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. एखादा विद्यार्थी कारणाशिवाय दीर्घकाळ गैरहजर असल्यास शिक्षकांनी तत्काळ पालकांशी संपर्क साधावा आणि बालविवाह किंवा बालमजुरीसारखे संशयास्पद प्रकार आढळल्यास पोलिस किंवा चाईल्ड हेल्पलाईनला कळवावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. ही महत्त्वपूर्ण कारवाई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुनील मेसरे, मुस्ताक पठाण, प्रसेनजित गायकवाड, चाईल्ड हेल्पलाईन केस वर्कर मिनाक्षी धडाडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या शायना शेख, पारामिता गजभिये आणि वानखडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.