सातारा २२ : सातारा शहरातील बसप्पा पेठ परिसरात सोमवारी सायंकाळी एक अंगावर काटा आणणारी आणि खळबळजनक घटना घडली. शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकतर्फी प्रेमातून वेड्या झालेल्या युवकाने गाठले आणि तिच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवून “तुला ठार मारीन” अशी थेट धमकी दिली. हा प्रकार सार्वजनिक रस्त्यावर घडल्याने तिथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली, मात्र युवकाच्या हातातील चाकूमुळे कोणीही पुढे जाण्याचे धाडस करत नव्हते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र युवकाने चाकू खाली ठेवण्याऐवजी पोलिसांनाही धमकावून “कोणी जवळ आलात तर हिला ठार करीन,” असे ओरडून धमक्या द्यायला सुरुवात केली. काही महिलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या सगळ्या गोंधळात एका धाडसी स्थानिक युवकाने मागच्या भिंतीवरून उडी मारत दबक्या पावलांनी आरोपीच्या मागे जाऊन चाकू पकडला. त्याच क्षणी इतर नागरिकांनीही झडप घालत आरोपीला जमिनीवर पाडले आणि त्याला बेदम मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मुलीला तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवले. या झटापटीत चाकूच्या स्पर्शाने मुलीच्या गळ्याला किरकोळ जखम झाली, तर आरोपीला पकडणाऱ्या युवकालाही हातावर थोडीशी इजा झाली आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्यावर पोक्सो कायदा, शारीरिक छळ, खुनाची धमकी व आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक तुषार जोशी यांनी सांगितले की, आरोपीचे वय लक्षात घेऊन पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाईल. दरम्यान, या घटनेचा काही भाग काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला असून, संबंधित शाळेचे शिक्षक व संस्थापक पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, मुलींच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ही घटना पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर वळणावर जाण्यापासून थांबवण्यात आली असली तरी समाजातील एकतर्फी प्रेमाच्या वाढत्या मानसिकतेचा धोकादायक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.




