कंपनीतील सुरक्षा नियम धोक्यात, अल्पवयीन बालकामगारांचा उघडकीस आलेला प्रकार
खापा, २७ : खापा जवळील दफई-किरणापूर येथील मँगॅनीज प्रॉडक्ट कॉर्पोरेशन या खाजगी कंपनीत झालेल्या भीषण अपघातात गणेश अशोक डोनारकर (वय 17, रा. टेकाडी, ता. पारशिवणी) या अल्पवयीन मजुराचा कन्व्हेअर बेल्टमध्ये हात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा मागील 12 ते 15 दिवसांपासून या कंपनीत काम करत होता. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने तो आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी येथे नोकरीला लागला होता. घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे रात्री 8 वाजता कामावर हजर झाला होता. पहाटेच्या सुमारास त्याचा हात कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला. सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला बाहेर काढले, पण गंभीर जखमेमुळे त्याला सावनेर येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले.
गंभीर अवस्थेमुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेयो शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर दुपारी त्याचा मृतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात आला.
कंपनीवर गंभीर आरोप – अल्पवयीन बालकामगारांची संख्या मोठी!
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि काही कामगारांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार:
कंपनीमध्ये परराज्यातून मजूर बोलावले जातात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन बालकामगारांना कामावर ठेवले जाते.
सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नाही, यामुळेच असा गंभीर अपघात घडला.
कमी मजुरीत बालकामगारांकडून धोकादायक यंत्रांवर काम करून घेतले जाते, ज्यामुळे कंपनी जास्त नफा कमावते.
कंपनीमार्फत निघणारे प्रदूषित वायू व अशुद्ध पाणी पर्यावरणीय प्रक्रियेशिवाय थेट वातावरणात सोडले जाते.
कंपनीकडून 10 लाखांचा चेक, पण नागरिकांचा संताप
अपघातानंतर मृतदेह कंपनीत आणण्यात आला असता, परिवाराने आणि ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. कंपनीचे मालक अजय खंडेलवाल यांनी मृतकाच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचा चेक कंपनीचे मॅनेजर बसंत खंडेलवाल यांच्या मार्फत दिला. त्यानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेला.
मोठा प्रश्न उभा: अल्पवयीन मुलांना धोकादायक यंत्रांवर कसे लावले जाते?
ही घटना अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करते:
अल्पवयीन मुलांना अशा धोकादायक यंत्रांवर कामावर ठेवण्यास परवानगी कोण देत आहे?
कामगार कायद्यांचे उल्लंघन करून कंपनी प्रशासनावर कोण कारवाई करणार?
सुरक्षा उपाय न करता कन्व्हेअर बेल्टसारख्या प्राणघातक यंत्रांवर अल्पवयीन मजूर कामावर लावणे हा गुन्हा नाही का?
कंपनीत नियमित लेबर इन्स्पेक्शन केले जात आहे का? की सरकारी यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे?




