– दिनांक १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजे पर्यंत गुन्हादाखल करण्याचे शिक्षण विभागाचे आश्वासन
यवतमाळ :- “सर्वत्र शिक्षा समिती” नावाच्या दिल्लीस्थित NGO कडून यवतमाळ जिल्ह्यात शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार युवकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी शिक्षणाधिकारीयांना लेखी निवेदन देत NGO च्या मुख्य संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की –
उमेदवारांकडून अर्जासाठी ३०० ते ४०० रुपये शुल्क आकारण्यात आले.
निवडीच्या वेळी “सिक्युरिटी डिपॉझिट” या नावाखाली प्रत्येकी १५,५०० रुपये घेण्यात आले.
केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणतीही परवानगी नसताना शासकीय भरतीसारख्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात आल्या.
निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांतून “बालसंस्कार” कार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र या योजनेला कोणतीही शासकीय मान्यता नव्हती.
नानवटकर यांनी असा गंभीर आरोप केला आहे की, शिक्षण विभाग काही अधिकारी या आर्थिक उलाढालीत सामील असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेरोजगारांचे पैसे परत करून “खरे दोषी सोडून किरकोळ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, हा चोर सोडून संन्याश्याला फाशी देण्याचा प्रकार आहे,” असा आरोपही निवेदनात करण्यात आला.
मनसेने इशारा दिला आहे की, जर शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ तपास करून संबंधित NGO च्या मुख्य संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही, तर फसवणूक झालेल्या बेरोजगारांसाठी विद्यार्थी सेना शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारेल.
बेरोजगार युवकांकडून घेतलेले काही शेकडो रुपये परत करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही समोर येत आहे. “अशा प्रकारे प्रकरण झाकून टाकल्यास दोषींना अधिक बळ मिळेल आणि भविष्यात पुन्हा-पुन्हा फसवणूक प्रकार घडतील,” असा इशाराही मनसेने दिला आहे.
या प्रकरणावर शिक्षण विभाग कोणती ठोस पावले उचलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रसंगी मनसे यवतमाळ शहर अध्यक्ष अमित बदनोरे , सुनील तायडे, प्रथमेश पाटील, तुषार कटपेलवार, दर्शन नानवरे, प्रज्वल ढवळे, निखिल गुज्जलवार, विनय मातने, अमोल भावरे, गणेश कोवे, श्रीराम खंडारे, तुळशीदास सावले, गणेश कानपुरे, ऋषी बनसोड, सुदर्शन पुनवटकर, धनराज राठोड, राम राठोड, शंकर कासारकर, शेख मुजफ्फर, प्रकाश मोरे, लक्ष्मण बावणे हे पदाधिकारी उपस्थित होते



