spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोकणातील 20 हजार हेक्टरहून अधिक खारभूमी लागवडीयोग्य; उर्वरित कामांतील तांत्रिक अडचणीही दूर करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई :- कोकणातील खारभूमीचे संरक्षण आणि शेतीयोग्य क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना मोठे यश मिळाले असून, मार्च २०२६ पर्यंत २० हजार १२७ हेक्टर क्षेत्र पुन्हा लागवडीयोग्य करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केला

मंत्री देसाई म्हणाले की, कोकणातील खारभूमीच्या जमिनींचे होणारे नुकसान रोखण्यासाठी जिल्हानिहाय १६५ खारभूमी विकास योजना मंजूर करण्यात आल्या होत्या. या योजनांद्वारे २२ हजार ५५८ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण व पुनर्स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी १३६ योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या असून, त्यामुळे २० हजार १२७ हेक्टर क्षेत्र पुन्हा शेतीयोग्य झाले आहे.

कोकणातील खारभूमीच्या जमिनींचे होणारे नुकसान रोखण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांमुळे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र पुन्हा लागवडीयोग्य करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यात मागील चार वर्षांत राज्य निधीतून २१ योजनांच्या नूतनीकरणासाठी ७६.२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १२ कामे पूर्ण झाली असून ५३५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. उर्वरित ९ कामे अंतिम टप्प्यात असून त्याद्वारे २,०८२ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण होणार आहे.

याशिवाय, कोकण आपत्ती सौम्यीकरण कार्यक्रमांतर्गत २०२४ मध्ये १४ कामांसाठी ८६.६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामेही अंतिम टप्प्यात असून त्यातून १,८९४ हेक्टर क्षेत्र संरक्षित होणार आहे. तसेच २०२६ मध्ये राज्य निधीतून ५ नव्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्याअंतर्गत ९४ हेक्टर क्षेत्राचे संरक्षण करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.