spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवकाळी पावसामुळे बाधित ७ लाख शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई :- राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने ७ लाख ९ हजार शेतकऱ्यांसाठी ७१७ कोटी रुपयांची मदत मंजूर केली असून, ही रक्कम डीबीटी पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य सतेज पाटील, सदाभाऊ खोत, शिवाजीराव गर्जे, प्रज्ञा सातव, विवेक कोल्हे, अंबादास दानवे यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी उपलब्ध आहेत, त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा केली जात आहे. उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यातही मदत जमा केली जाईल. काही शेतकरी किंवा पशुपालकांना अद्याप मदत मिळाली नसल्यास संबंधित तक्रारी शासनाकडे सादर कराव्यात. अशा प्रकरणांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून दिली जाईल.

खरीप हंगामात पीक व शेतीच्या नुकसानीसाठी १ कोटी ५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ८ हजार २३६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच रब्बी हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतीचे वितरणही सुरू असून, ई-केवायसी किंवा बँक खात्यांतील तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेली रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.

Popular Articles