spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पोलिस बांधवांना राखी बांधून मोरया फाउंडेशनने साजरा केला रक्षाबंधनाचा सामाजिक संदेश

नागपूर :- रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा सण म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या सणाला सामाजिक बांधिलकीची जोड देत दरवर्षीप्रमाणे यंदाही मोरया फाउंडेशनच्या वतीने रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावर्षीचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम हुडकेश्वर पोलिस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा’ या भावनेतून हा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी एसीपी चंदा दंडवते यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरया फाउंडेशनच्या सदस्यांनी पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस कर्मचारी आपल्या कुटुंबापासून दूर राहून, सण- उत्सवाच्या काळातही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या सेवाभावाची आणि त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम असल्याचे फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिस बांधवांच्या मनगटावर राखी बांधताना फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांच्या कर्तव्याला आणि समाजसेवेला सलाम केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस- रात्र कार्यरत असलेल्या पोलिस यंत्रणेप्रती समाजात विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमामुळे पोलिस कर्मचारी आणि फाउंडेशनच्या सदस्यांमध्येही भावनिक व आत्मीय वातावरण निर्माण झाले. यावेळी मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. रजनी अविनाश चौहान यांनी रक्षाबंधनाच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले की, “रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पोलिस बांधव समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे त्यांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्याप्रती विश्वास, सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.” समाजात सुरक्षितता, बंधुभाव, परस्पर विश्वास आणि सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. रक्षाबंधनाच्या पारंपरिक भावनेला सामाजिक जबाबदारीची जोड देऊन विविध क्षेत्रात समाजाचे संरक्षण करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा मोरया फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मोरया फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. नागरिक आणि पोलिस यांच्यातील परस्पर विश्वास अधिक दृढ करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचा सकारात्मक परिणाम होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाला संध्या कठमुसरे, वृषाली कुबडे, माधुरी इत्तेडवार, लता डायरे, सविता तडस, नेहा मगर, गौरी डफ, पूर्वा पांगुळ, ज्योती नागपूरकर यांच्यासह मोरया फाउंडेशनच्या सदस्यांची उपस्थिती होती. रक्षाबंधनाच्या दिवशी पोलिस बांधवांना राखी बांधून त्यांच्या सेवेला मानाचा मुजरा करण्याच्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.