किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्याच्या सीमेवर स्थित वायगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर चिखलाचे साम्राज्य असून, या पटांगणात गट्टू लावण्याची मागणी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
येथील मुख्याध्यापकांसह शिक्षकवृंद तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याचे ठिकाण सुंदर शहर नागपूर येथून दररोज शाळेत येणे – जाणे करतात. नागपूर ते खात चारचाकीने तर खात ते वायगाव दुचाकीने. सुंदर शहर नागपूर येथे राहणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांचे नियुक्त असलेल्या शाळेत प्रवेशद्वारा समोरील पटांगणात पावसाळ्यात दररोज चिखलाने स्वागत होत असते. शिक्षकांनी जिल्ह्याच्या ठिकाणी शहरात राहून तालुक्याच्या सीमेवर असलेल्या शाळेत शहरातून जाणे-येणे करून विद्यार्थ्यांना विद्यादान करण्यासाठी शासनाने शिक्षकांचे पगार भरमसाठ वाढवलेले आहे. मात्र जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधेकडे निधी पुरवण्यास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर वायगाव येथील पालकांनी केला आहे. शिक्षकांच्या पगाराप्रमाणे शाळेच्या भौतिक सुविधेसाठी भरमसाठ निधी उपलब्ध करून देऊन शाळेच्या इतर भौतिक सुविधेसह पटांगणात त्वरित गट्टू लावण्याची मागणी, वायगाव येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.








