नागपूर :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिका निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीसाठी नामांकन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया मंगळवार २३ डिसेंबरपासून सुरू झाली असून, ती ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. प्रत्येक झोनमध्ये स्थापित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामांकन अर्ज स्वीकारले जात आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरिता विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. अशा निवडणूकीच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.
या निवडणुकीसाठी नागपूर महानगरपालिकेकडून सुमारे १५ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नागपूर शहरासाठी एकूण ३,००४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष व तीन मतदान अधिकारी अशा चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
या कर्मचाऱ्यांना मतदान संदर्भातील पहिले प्रशिक्षण २८ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी दिले जाणार आहे. मतदान पथकाचे एकूण तीन प्रशिक्षण होणार असून, त्यात त्यांना मतदान प्रक्रीये विषयी तसेच ईव्हीएम मशीन संदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतदान पथकासोबतच क्षेत्रीय अधिकारी, खर्च पथके, एसएसटी-व्हीएसटी पथके यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, नेहमीचे अनुभवानुसार काही कर्मचारी निवडणुकीचे काम टाळण्यासाठी विविध कारण सांगण्याचा प्रयत्न करतात.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यापासून पळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर राज्य निवडणूक आयोगाच्या १९९५ व २०१८ च्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी फौजदारी कारवाई ही करण्याचा इशारा संबंधितांना मनपा आयुक्त यांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असून निवडणुकीसाठी निर्गमित आदेश नाकारणे, निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणे अथवा निवडणूक कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.




