Thursday, April 30, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुन्हे तपासासाठी नागपूर पोलिसांच्या दिमतीला अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन

– अंमली पदार्थांची लवकर ओळख पटणार,

– घटनास्थळांचे थ्री-डी मॉडेल उपलब्ध होणार

नागपूर :- अंमली पदार्थ विषयक गुन्हे तपास अत्यंत गुंतागुंतीचा असतो. संशयित आरोपीकडून जप्त झालेले पदार्थ अंमली स्वरुपाचे आहेत की नाहीत, याचा पोलिसांना सुरुवातीला अंदाजच घ्यावा लागतो. मात्र, नागपूर पोलिसांना लवकरच उपलब्ध होणाऱ्या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनमुळे पोलिसांपुढील ही प्राथमिक अडचण दूर होणार आहे. याशिवाय, या व्हॅनमुळे कुठल्याही महत्त्वाच्या गुन्ह्यात तपास पथकाला घटनास्थळाचे अगदी अचूक त्रिमितीय (Three-Dimensional) डिजिटल मॉडेल उपलब्ध येणार असून घटनास्थळावरील अत्यंत बारीक-सारीक गोष्टींच्या नोंदी घेऊन ही माहिती डिजिटल स्वरूपात जतन करता येणार आहे.

भारतीय न्याय संहितेत गुन्ह्यांमधील ई-पुराव्यांना अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सातत्याने प्रगत न्यायसहायक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे मागील काही वर्षात राज्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे व्यापक प्रमाणात आधुनिकीकरण करण्यात येत आहे. याअंतर्गत प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनही राज्य पोलिस दलाच्या दिमतीला देण्यात येण्यात आल्या आहेत. सध्या राज्यभरात तब्बल २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तैनात करण्यात आल्या असून त्यात ८ आधुनिक व्हॅनचा समावेश आहे. सुमारे २,२०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांचा वापर सुरु आहे.

गुन्हे तपासात एवढ्या व्यापक प्रमाणात फॉरेन्सिक व्हॅनचा वापर करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे मानले जाते. मात्र, आता न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाने (डीएफएसएल) त्याही पुढे जाऊन अतिरिक्त फिचर्स असलेल्या दोन अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन मुंबई आणि नागपूरसाठी उपलब्ध केल्या आहेत. गेल्याच महिन्यात व्हॅन नागपुरात दाखल झाली असून त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. ते पूर्ण होताच ती नागपूर शहर पोलिसांच्या दिमतीला पुरविली जाणार आहे.

या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनची माहिती देताना नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळेच उपसंचालक अश्विन गेडाम यांनी सांगितले की, त्यात दोन अतिरिक्त फिचर्स पुरविण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने अंमली पदार्थांची प्राथमिक स्वरुपात ओळख पटविणाऱ्या एफटीआर उपकरणांचा समावेश आणि संपूर्ण घटनास्थळाचे त्रिमितीय (Three-Dimensional) डिजिटल मॉडेल उपलब्ध करणाऱ्या कॅमेरा फिचर्सचा समावेश आहे.

एखाद्या व्यक्तीकडे आढळून आलेला संशयित पदार्थ अंमली पदार्थ आहे की नाही, याची खातरजमा घटनास्थळावरच करणे शक्य होणार आहे. एरवी, ते जप्त करून न्यायसहायक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जाते व त्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांची कारवाई सुरु होते. मात्र, आता पोलिसांना तात्काळ निर्णय घेणे सोपे होणार आहे. याशिवाय, या व्हॅनमध्ये उपलब्ध अत्याधुनिक कॅमेरांच्या साह्याने कुठल्याही महत्त्वाच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष घटनास्थळाचे ३६० अंशात स्कॅनिंग करणे शक्य होणार आहे. या त्रिमितीय डिजिटल चित्रणात घटनास्थळाचे नेमके लोकेशन, दृश्य, अचूक मोजमाप, घटनास्थळावरील वस्तू अशा सर्व प्रकारच्या डिजिटल नोंदी घेणे शक्य होते. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच तांत्रिक तपासात संपूर्ण पारदर्शकता आणता येते व या नोंदी डिजिटल स्वरुपात साठवून ठेवता येतात. अगदी घटनास्थळापासून ते प्रयोगशाळेपर्यंतच्या साऱ्या घडामोडी टिपता येतात व पुरावे संकलनापासून ते विश्लेषणापर्यंतची सर्व माहिती सुरक्षितपणे नोंदविता येते.

घटनास्थळावरील प्रत्येक गोष्ट ब्लॅकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षितपणे साठवली जाते. त्यामुळे पुराव्यांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता पूर्णपणे टाळता येते व ते पूर्णपणे विश्वासार्ह ठरतात. याशिवाय, संबंधित अधिकारी आणि विभागांना रियल-टाईम माहिती उपलब्ध होते. न्यायालयीन प्रक्रियेत पुराव्यांची विश्वसनीयता अतिशय भक्कम होते. यासंदर्भात बोलताना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक विजय ठाकरे यांनी सांगितले की, नव्या तंत्रज्ञानामुळे तपासात अचूकता आणि पारदर्शकता आणण्यात मोठीच मदत होणार आहे. कुठलेही नवे फॉरेन्सिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास त्याचा राज्यात वापर करण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.