खापा, वार्ताहर :- शासकीय योजना आणि सामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या तलाठी कार्यालयाला आता हक्काची आणि सुसज्ज ईमारत मिळाली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता, मौजा उमरी (भ.) ता. सावनेर येथील ग्रामस्थांनी ‘लोकवर्गणी’ आणि ‘श्रमदानातून’ या कार्यालयाचे देखणे बांधकाम पूर्ण केले असून, हे काम संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
या कामाबाबत अक्षय पोयाम, तहसिलदार सावनेर, भास्कर कचडे, सरपंच, उमरी (भ.) व विश्वजीत डांगे, तलाठी उमरी (भ.) यांनी पुढाकार घेवुन सदर कार्य घडवून आणलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उमरी (भ.) येथील तलाठी कार्यालय जुन्या आणि मोडकळीस आलेल्या भाड्याच्या खोलीत भरत होते. यामुळे पावसाळ्यात कागदपत्रांचे नुकसान होणे आणि शेतकऱ्यांची बसण्याची गैरसोय होणे अशा समस्या निर्माण होत होत्या. यावर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून इमारत बांधण्याचा संकल्प केला.
सदर इमारतीचे काम प्रत्यक्षात पूर्ण करून शासनाचे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे मुहूर्तावर डॉ. आशिषराव देशमुख, आमदार, सावनेर विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते दि. १७ एप्रिल रोजी नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा गावातील नागरीकां समक्ष साजरा करण्यात आला.
या उपक्रमाचे आमदार देशमुख यांनी विशेष कौतूक करुन ग्रामस्थाच्या या एकीमुळे कामाला गती मिळेल आणि पारदर्शक कारभारसाठी एक चांगले वातावरण निर्माण हाईल, असे मत व्यक्त केले. तसेच या उपक्रमाचा तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्हयातील सर्व गावांनी प्रेरणा घ्यावी, तसेच अश्या प्रकारचे आदर्श घेण्यासारखे उपक्रम राबवावे, असे आवाहन आमदार देशमुख यांनी केले.

