पिली मारबत मिरवणुकीसाठी नागपूर पोलिस सतर्क; आयुक्तांनी केली मार्गाची पाहणी

0
58

नागपूर २२ : नागपूर शहरात शनिवार, २४ ऑगस्ट रोजी पार पडणाऱ्या पारंपरिक पिली मारबत मिरवणुकीस पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्यापक सुरक्षा उपाययोजना करण्यात येत आहेत. गुरुवारी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी स्वतः मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली आणि संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्ताचे आदेश दिले. आयुक्तांनी स्पष्ट केले की, मिरवणुकीच्या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात केला जाईल. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना मिरवणुकीत शांतता राखण्याचे, पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिली मारबत ही नागपूरची सांस्कृतिक ओळख दर्शवणारी मिरवणूक असल्याने तिचा शांततेत आणि उत्साहात उत्सव साजरा होणे गरजेचे आहे, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.