नागपूर १० : नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल रात्री गोसीखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आल्यानंतर, उमरेड विभागात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, टेकेपार, आवरमारा आणि चिंचघाट या गावांमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली.
या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांनी पुरग्रस्त भागाला भेट दिली. आम नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर संपर्क तुटलेल्या टेकेपार गावात पोहोचण्यासाठी एन.डी.आर.एफ. (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) पथकासोबत बोटीने प्रवास केला.


या भेटीत उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन आणि कुही तहसीलदार अमित घाटगे हेही त्यांच्यासोबत होते. टेकेपारमध्ये स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी गावातील दोन लहान मुलांना ताप असल्याचे निदर्शनास आले, आणि त्यांना वैद्यकीय उपचारांची तातडीने गरज होती.
एन.डी.आर.एफ. पथकाने अविनाश गायकवाड, पत्नी भारती गायकवाड, त्यांचे आठ महिन्यांचे आजारी बाळ आणि ६ वर्षांचा मुलगा यांना सुरक्षितपणे गावाबाहेर हलवले. वेलतूर पोलिसांनी या कुटुंबाला त्वरित रुग्णालयात पोहोचवले आणि वेळेवर उपचार मिळवून दिले.
याशिवाय, गावातील अन्य नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी योग्य ठिकाणांची पाहणीही करण्यात आली. एन.डी.आर.एफ. पथकाचे नेतृत्व कृपाल मुळे यांनी केले. या कार्यवाहीमुळे पुराच्या संकटात अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पुरपरिस्थिती आणि पोलिसांचे उपाययोजनांचे वृत्त
नागपूर उपविभाग:
बोरी पोलीस ठाणे हद्दीतील सिंधी गाव आणि बेला पोलीस ठाणे हद्दीतील कळमना, पौनी, सिंगोरी, चारगाव, बेसूर या गावांचा संपर्क पुलांवरून पाणी गेल्यामुळे तुटलेला आहे. संबंधित मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आली असून, सर्व गावातील पोलीस पाटलांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रामा धरणाचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उमरेड उपविभाग:
कुही ते पाचगाव, कुही ते वाठोडा रस्त्यावर तसेच चिखलापार पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. गावातील पोलीस पाटलांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सावनेर उपविभाग:
पाटण सावंगी गावात पूरपरिस्थितीमुळे ४ घरे रिकामी करण्यात आली. रायवाडी परिसरात पाहणी करण्यात आली आणि खापा येथील कन्हान नदीजवळील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जेथे पुलांवरून पाणी वाहत आहे, त्या सर्व मार्गांवर बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.
रामटेक उपविभाग:
पारशिवनी पोलीस ठाणे हद्दीतील कालभैरव पेठ ते भागेमाहेरी, बिटोली, परसोडी रस्ते बंद आहेत. मात्र पालसवली, चारगाव कडून रस्ता सुरू आहे.
साकारला ते कुसुमधारा, दिघलवाडी ते इडगाव, मेहंदी ते बखारी अशा अनेक ठिकाणी पाणी पुलावरून वाहत असल्याने रस्ते बंद आहेत.
अरोली पोलीस ठाणे हद्दीतील धनोली ते कोदामेंढी, तांडा पुल भाग कोसळल्यामुळे बंद करण्यात आला आहे.
दुधाळा कॅनालची भिंत कोसळली असून बॅरिकेडिंग करण्यात आली आहे.
नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने तेही रस्ते बंद आहेत.
सर्व गावांतील पोलिस पाटलांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कन्हान उपविभाग:
आजनगाव ते तेलीमांगली रोडवरील नाल्यावरून पाणी जात असल्याने बॅरिकेडिंग करून रस्ता बंद.
तारसा येथील पुलावरून पाणी वाहत आहे.
गोंडेगाव (कन्हान पो.स्टे. हद्दी) येथील १५ घरांत पाणी शिरल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
जिथे रस्ते बंद झाले आहेत, तेथे पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वाहतूक थांबवली आहे.
काटोल उपविभाग:
काटोल पोलीस ठाणे हद्दीत मसली ते दिग्रस बु. रोडवरील पुलावरून तसेच येरला धोटे गावच्या नाल्यावरून पाणी वाहत आहे.
त्यामुळे गावांमध्ये पी.ए. सिस्टीम वरून सूचना देण्यात आल्या. रस्त्यावर रोप लावण्यात आले असून पोलिस पाटलांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.




