हंसराज,भंडारा :- स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी कार्यरत असलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडी, पूर्व विदर्भाच्या उपाध्यक्षपदी मुकेश कुमार यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या वतीने विदर्भभर संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात येत असून, युवा वर्गाला संघटित करण्याच्या दृष्टीने मुकेश कुमार यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नियुक्ती पत्रानुसार, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा, तालुका आणि गावपातळीपर्यंत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आव्हान मुकेश कुमार यांच्यासमोर आहे. परिसरातील समितीच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून अधिकाधिक नागरिकांना समितीशी जोडणे, सदस्य नोंदणी वाढविणे तसेच समितीने जाहीर केलेल्या विविध आंदोलनांमध्ये जनतेचा मोठ्या संख्येने सहभाग करून घेणे, या प्रमुख जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत.
मुकेश कुमार हे सामाजिक, मानवाधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणे आणि अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. जनसामान्यांच्या समस्या समजून घेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच संबंधित प्रश्नांवर पाठपुरावा करण्यासाठी ते सक्रिय राहिले आहेत.
मुकेश कुमार हे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच नॅशनल मीडिया प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष म्हणून पत्रकार आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातही मुकेश कुमार यांचा सक्रिय सहभाग राहिला असून ते ‘महा विदर्भ टीव्ही’चे संपादक म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि जनतेशी संबंधित विविध मुद्द्यांना माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम ते करत आहेत. याशिवाय देशातील विविध प्रतिष्ठित मोठ्या मीडिया चॅनेल्ससाठी काम करण्याचा अनुभव त्यांना आहे.
सामाजिक कार्य, मानवाधिकार आणि पत्रकारिता या विविध क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीच्या संघटनात्मक विस्तारासाठी करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी युवा शक्तीला संघटित करण्यावर भर देण्यात येणार आहे. पूर्व विदर्भातील सहाही जिल्हे, तालुके आणि ग्रामीण भागात समितीचे संघटन मजबूत करण्यासाठी मेश्राम यांच्याकडून कार्य केले जाणार आहे. युवकांना समितीच्या विचारांशी जोडणे, सदस्यसंख्या वाढविणे आणि विविध आंदोलनांमध्ये लोकसहभाग वाढविणे यावर विशेष भर राहणार आहे.
दरम्यान, मुकेश कुमार यांच्या नियुक्तीबद्दल ॲड. वामनराव चटप, अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती तथा माजी आमदार; प्रकाश पोहरे, मुख्य संपादक दैनिक देशोन्नती; निवास खान्देवाले, मार्गदर्शक तथा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ; मंजुषा तिरपुडे, अध्यक्षा महिला आघाडी; अरुणभाऊ केदार, अध्यक्ष पूर्व विदर्भ; कपिल ईद्दे, अध्यक्ष युवा आघाडी पूर्व विदर्भ आणि मुकेश मासुरकर, अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ प्रदेश यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
युवा आघाडीच्या माध्यमातून पूर्व विदर्भातील संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळेल आणि विविध जिल्ह्यांतील युवकांना संघटित करण्यास चालना मिळेल, अशी अपेक्षा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



