नवे संकल्प : एक (नुसतेच) चिंतन..!

0
55

हा हा म्हणता म्हणता (आणखी) एक वर्ष गेले. काही जणांचे हो हो म्हणताना गेले. काहींचे हीही करताना गेले. नव्या वर्षात संकल्प करायचे असतात. नव्या वर्षात काहीही झाले तरी हा हा म्हणायचे नाही, असा संकल्प काही जणांनी केला आहे. बऱ्याच जणांना संकल्प कसला करायचा हेच मुदलात सुचले नाही. तात्पर्य येवढेच की, संकल्पाशिवाय नवे वर्ष साजरे होऊ शकत नाही. गेल्या वर्षी आम्ही पक्का संकल्प करुन नाना व्यसने सोडून दिली. उदाहरणार्थ, उधार-उसनवार मागणे सोडून दिले. नावडत्या नेत्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंग करायचे व्यसनही जडले होते. -तेही सोडले. विडी-माव्याचे वाईट व्यसन सोडले. अनिल पानवाल्याच्या गादीकडे मुळ्ळीच फिरकायचे नाही, हा संकल्प आम्ही जिद्दीने तडीला नेला. वर्षभर त्या दिशेने फिरकलो नाही. आणि नेमका डिसेंबरात खुद्द अनिल पानवाल्याने भर फर्ग्युसन रस्त्यावर आमची कालर पकडली. त्यास समजावले की ‘‘मित्रा, सखया, तुझी उधारी कुठे पळून जाणाराय? तुझ्या विड्यांनी, आणि माव्यांनी माझे नश्चर शरीर पोखरले. तेच नष्ट झाले तर तुझी उधारी कशी मिळावी? म्हणून मी तुजला टाळिले. येत्या वर्षात तुझी उधारी चुकती करीन हो!’’ पण अनिल बेट्याने ऐकले नाहीन. माझे मनगटी घड्याळ काढून घेऊन गेला! जाऊ दे. त्या जुनाट बिघाडयुक्त घड्याळात तरी आता काय उरले होते?

नव्या वर्षात रोज सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प केला आहे. सूर्यनमस्काराआधी प्रभातचालीस जाण्याचाही इरादा आहे. उगवत्या सूर्यास नमस्कार करत करतच हे जीवन आम्ही आजवर व्यतीत केले. प्रभातचालीनंतर सूर्यनमस्कार घालून, हास्य क्लबात हात वरी करुन होहोहीहीहाहादी व्यायाम करुन मगच परत यायचे, असाही एक संकल्प आहे. यंदाचे वर्षी मिसळ, शॅम्पलपाव, कांदाभजी, बटाटवडे हे तामसी पदार्थ वर्ज्य करणार आहे. तर्रतर्रीत पदार्थ खाल्ल्याने मन चंचल आणि विकारी होते. आहार कसा सात्विक असावा. तदनुसार या वर्षी सात्विकतेने जीवन जगण्याचे ठरवले आहे. मांसाहाराचेही तसेच! नाही खाल्ले कबाब आणि टिक्के तर बिघडले कुठे? बिर्याणी हा पदार्थ आम्हाला आजवर सात्विक वाटत होता, पण आता तो तामसी असल्याचे समजले आहे. त्याचे काय करायचे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. रोज डायरी लिहिण्याचा संकल्प असून गेल्या वर्षीचीच कोरी डायरी (तारखा बदलून) नव्याने वापरण्याचा इरादा आहे. डायरी लिहावी, कां की त्यामुळे आचार-विचारांना शिस्त लागते. लेखनकला बहरते, आणि एकंदरितच व्यक्तिमत्त्व झळाळून येते, असे आम्ही कुणाच्या तरी डायरीतच चोरुन वाचले आहे. या वर्षी आम्ही चोरुन डायऱ्या वाचायच्या नाहीत, असेही ठरवले आहे.

तथापि, हे सगळे आम्ही ठरवले, आणि नेमकी इलेक्शने आली! सगळे मुसळ केरात गेले!! औंदा नवे वर्ष आले तेच मुळी महापालिकेच्या निवडणुका घेऊन!! काळ मोठा कठीण आहे. वर्षाच्या सुरवातीलाच बरेच काही उलटेपालटे होणार आहे, असे दिसते. गेल्या वर्षअखेरीला गुजराती भाषक पंतप्रधान बदलून मराठी पंतप्रधान बसणार होते. थोडक्यात हुकले!! पण तेच येत्या वर्षात निदान मुन्सिपाल्टीच्या लेव्हलवर घडू शकते, हे विसरु नका. अगदी येत्या वर्षात नाही तरी पुढेमागे नक्कीच घडू शकते.

आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाही चिरंतन सुस्थिर राहावी, यासाठी आम्हाला आमचे सगळे संकल्प पुढे ढकलावे लागले व ३१ जानेवारीची रात जागवावी लागली. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आलेलिंबू चोखत आम्ही दिलेल्या या शुभेच्छा गोड मानून घ्याव्या.