– यवतमाळमध्ये मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ३०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी
यवतमाळ :- तिरळेपणावरील उपचारांसाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्ट नयनतारा’ अंतर्गत यवतमाळ येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी ३०० पेक्षा अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीत शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरणाऱ्या रुग्णांवर २१ व २२ नोव्हेंबर रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी शिबिरातील रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, आनंद देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य राज्य समन्वयक डॉ.रितेश पाटील, मुख्य नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, सचिव राजेश पवार, डॉ. प्रशांत उईके, डॉ. सुखदेव राठोड, डॉ. सुभाष ढोले, नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. जोशी, डॉ. प्रसाद बनसोड यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
पालकमंत्री ना. संजय राठोड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत यवतमाळमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे, ही आनंदाची बाब आहे. तिरळेपणावरील उपचारांसाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांत जाण्याची गरज आता रुग्णांना भासणार नाही. पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून येथेच उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असून, अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना नवी संधी मिळत आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. भविष्यात तालुकास्तरावरही अशा शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री म्हणाले, तिरळेपणावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये साधारणतः ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, या शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना ही सुविधा मोफत उपलब्ध होत आहे, ही समाधानाची बाब आहे. यापूर्वी जिल्हा परिषद शाळांमधील तिरळेपणाग्रस्त मुलांच्या उपचारांसाठी विशेष मोहीम राबवून पालकांना प्रोत्साहित करण्यात आले होते. ही मोहीम पुन्हा राबवून जिल्हा परिषद शाळा तिरळेपणामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. मधुसूदन झंवर यांनी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. शासन, समाज आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडवून आणता येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. जोशी आणि राज्य समन्वयक रितेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात मुख्यमंत्री सहायता कक्षाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रसाद बनसोड यांनी शिबिराची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला.
या उपक्रमामुळे तिरळेपणाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या बालकांसह तरुण व प्रौढ रुग्णांना मोफत उपचाराची संधी उपलब्ध झाली असून, त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या शिबिरासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षासोबत सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या सर्व चमू जिल्हा परिषद शिक्षण विभाग व वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तज्ञांनी परिश्रम घेतले.






