अकोला १४ : येत्या उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अकोला पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कवडे नगर, सिंधी कॅम्प, खांड परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड विशाल लक्ष्मण ढोकणे (वय २५) याला एमपीडीए कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. त्याला १२ ऑगस्ट रोजी जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे. विशाल ढोकणे याच्यावर बेकायदेशीर जमावबंदी, दंगल, प्राणघातक शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, शांतता भंग करणे अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी त्याच्याविरोधात विविध प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याने या कारवायांकडे दुर्लक्ष करत आपले गुन्हेगारी वर्तन सुरूच ठेवले होते.
त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांवर आळा घालण्यासाठी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची बारकाईने कायदेशीर तपासणी केल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्याला अटक करण्याचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला आहे. पोलिस प्रशासनाने सांगितले की, अशा प्रकारचे गुन्हेगारी वर्तन सहन केले जाणार नाही आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.




