Home Latest News जय भीम चौकात ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या पोलिसांकडून ७ संशयित ताब्यात

जय भीम चौकात ३० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या पोलिसांकडून ७ संशयित ताब्यात

0
49

नागपूर १४ :  नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय भीम चौक परिसरात एका ३० वर्षीय तरुणाची डोक्यात जड वस्तूने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव राजेश धनविजय (वय ३०, रा. हिरवी नगर, जय भीम चौक) असे असून, ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडल्याचा अंदाज आहे. प्राथमिक माहितीनुसार, राजेशला दारूचे व्यसन होते आणि तो वारंवार आपल्या मित्रांसह जय भीम चौकातील भाऊराव अवसरे यांच्या घरी दारू पार्टीसाठी जात असे. मंगळवारी देखील तो अशाच एका पार्टीसाठी तिथे गेला होता. मात्र, त्यानंतर त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी घरात आढळून आला. त्याच्या डोक्यावर जड वस्तूने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना उघडकीस येण्यामागे परिसरातील एका हॉटेल मालकाची भूमिका महत्त्वाची ठरली. बुधवारी सकाळी परिसरात मृतदेहाबाबत चर्चा सुरू असताना संबंधित हॉटेल मालकाने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. राजेश हा खासगी कंपनीत करवतीच्या मशीनवर काम करत होता. तो फक्त जेवणासाठीच घरी येत असे. त्याच्या कुटुंबात आई आणि एक बहीण असून, त्याचे वडील वारलेले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत ६ ते ७ संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि मारेकरी कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नंदनवन पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, लवकरच गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.