– पॉलीमार्बलवरील नाजूक कलाकुसर आणि चमकदार रूपाने वेधले सर्वांचे लक्ष; सोन्या-चांदीसारखी झळाळी आणि मौल्यवान रत्नजडित कलाकुसरीचा भास; ‘अवंती ऑफिशियल’ ब्लॉगसाठीही निवड.
खापा, वार्ताहर :- नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार अभय घुसे यांनी कोराडी देवीची आकर्षक प्रतिकृती साकारली आहे. पॉलीमार्बलपासून तयार करण्यात आलेल्या या प्रतिकृतीवरील बारीक कलाकुसर, मनमोहक चमक आणि सुबक रचना विशेष लक्ष वेधून घेत आहे. या प्रतिकृतीचे स्वरूप इतके आकर्षक आहे की, जणू ती सोने-चांदीपासून बनविली असून त्यावर मौल्यवान रत्ने जडविण्यात आली आहेत, असा भास होतो.
विशेष म्हणजे, कंटेंट क्रिएटर ‘अवंती ऑफिशियल’ यांनी नवरात्रीदरम्यान आपल्या ब्लॉगसाठी या सुंदर प्रतिकृतीची निवड केली आहे. मूर्तिकार अभय घुसे यांनी आपल्या कलाकौशल्यातून साकारलेल्या या प्रतिकृतीमुळे त्यांच्या सर्जनशीलतेची प्रचिती येत असून, शहराच्या कलावैभवातही भर पडली आहे. देवीच्या आकर्षक रूपामुळे ही प्रतिकृती कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.








