– वेकोलिच्या पाटणसावंगी खाणीतील घटना
नागपूर :- ऑपरेटर काम करीत असताना ऑपरेटर कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेकोलिच्या पाटणसावंगी कोळसा खाणीत गुरुवारी, ५ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ते बेल्टमध्ये अडकले कसे? याबाबत कुणालाही माहिती नाही. या घटनेच्या कारणांचा व कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती वेकोलि व पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शेतीच्या ऐवजी मिळाली होती नोकरी
जगदीश सुरेश आसुटकर (३६, रा. वेकोलि कॉलनी, सद्भावना नगर, पाटणसावंगी, ता. सावनेर) असे मृत कामगाराचे नाव आहे. ते मूळचे चरूरखटी, ता. वरोरा) येथील रहिवासी असून, त्यांची तीन एकर शेती वेकोलिच्या कोळसा खाणीसाठी अधिग्रहित करण्यात आल्याने त्यांना वेकोलिने ऑपरेटरपदी नोकरी दिली होती.
आर्थिक मदत व पत्नीला नोकरी
जगदीश आसुटकर यांच्या पश्चात पत्नी व अनुक्रमे आठ व सहा वर्षे वयाच्या दोन छोट्या मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यातून सावरण्यासाठी वेकोलि प्रशासनाने त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि पत्नीला वेकोलित नोकरी देण्याची ग्वाही दिली आहे.
कामगारांची सुरक्षा ऐरणीवर
या घटनेमुळे भूमिगत कोळसा खाणीत काम करणाऱ्या ऑपरेटर व कामगारांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या घटनेची कुठलीही माहिती खाण व्यवस्थापक अंकुश तिवारी, सुरक्षा अधिकारी साईकुमार व कामगार नेते राहुल सिरिया यांना वेळीच देण्यात आली नव्हती. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार यादव व जितेंद्र सिंग महल यांनी घटनास्थळी भेट दिली.





