नागपूर, दि. २४ – भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये २५ व २६ जुलै २०२५ या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. दिनांक २५ व २६ जुलै, २०२५ या दिवसांकरिता ऑरेंज अलर्ट दिलेला असुन ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. तसेच नदी, नाले, दुथळी वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची अशा ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी व प्रशासणकडून निर्गमित होत असलेल्या सुचणांचे पालन करून सहकार्य करावे.
जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांचा संपर्क क्र. ०७१२-२५६२६६८ तर नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ७०३०९७२२००/०७१२ – २५६७७७७ असा आहे








