Tuesday, February 10, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सुरबन–बोंडगाव परिसरातील मका पिकाच्या नुकसानीचा पंचनामा; २१ शेतकऱ्यांचे नुकसान निष्पन्न

यासीन शेख गोंदिया :- अर्जुनी-मोर तालुक्यातील  सुरबन–बोंडगाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या मका पिकावर तणनाशक फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार “अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटना” यांच्या वतीने करण्यात आली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत आज संबंधित विभाग व कंपनी प्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा केला.

या पंचनाम्याकरिता जिल्हा उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया महेंद्रजी ढोकळे, तालुका कृषी अधिकारी सुलक्षणा पाटोळे, सिजेंटा कंपनीकडून वल्लभ महाजन, कुसवंत मनकवडे तसेच त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. सर्व अधिकारी व प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

पाहणीदरम्यान एकूण २१ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी सर्व २१ नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या-आपल्या शेतामध्ये उपस्थित होते. पिकाची पाने जळालेली, वाढ खुंटलेली व उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र पाहणीदरम्यान दिसून आले.

या पंचनाम्यावेळी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे, हेमराज बेलखोडे, देवानंद डोंगरवार, नितेश कुंबरे, श्रावणजी मेंढे तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत प्रशासन व कंपनीकडे ठोस भरपाई देण्याची मागणी केली.

यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की, शिफारस केलेल्या तणनाशकांचा वापर करूनही पिकांचे नुकसान झाले असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन घटल्यास कर्जफेड व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच कंपनी प्रतिनिधींनीही अहवालाच्या आधारे योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय व नुकसानभरपाई मिळावी, यासाठी अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com