– कॅन्सर व जनरल वॉर्डमधील सुमारे ३० बालरुग्णांना भेटवस्तूंचे वाटप; चित्रकला उपक्रमातून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
नागपूर :- बालदिन हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि नव्या स्वप्नांची उमेद निर्माण करणारा दिवस असतो. मात्र, आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चिमुकल्यांना अनेकदा या आनंदापासून दूर राहावे लागते. अशा बालरुग्णांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण व्हावेत, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्यांना प्रेम, आपुलकी व प्रोत्साहनाचा अनुभव मिळावा, या उदात्त हेतूने पिटक फाऊंडेशन, नागपूर यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर येथे बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमात रुग्णालयातील कॅन्सर विभाग तसेच जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या सुमारे ३० लहान मुलांचा सहभाग होता. बालदिनानिमित्त या चिमुकल्यांसाठी विविध आनंददायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येक मुलाला आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भेटवस्तू मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि त्यांच्या निरागस हास्यामुळे संपूर्ण परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला चित्रकला उपक्रम. या उपक्रमात मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंग देत विविध विषयांवर सुंदर चित्रे साकारली. आजारपण आणि रुग्णालयातील उपचारांचे वातावरण विसरून मुलांनी चित्रकलेत मन रमविले. रंग, कुंचले आणि कागद यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व कल्पना व्यक्त केल्या. या उपक्रमामुळे मुलांना काही काळासाठी रुग्णालयीन वातावरणातून बाहेर पडून आनंदाचे क्षण अनुभवता आले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बालकांना केवळ औषधोपचारांचीच नव्हे, तर मानसिक आधार, सकारात्मक वातावरण आणि भावनिक पाठबळाचीही आवश्यकता असते. विशेषतः कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकल्यांसाठी आनंदाचे छोटे क्षणही मोठे बळ देणारे ठरतात. हीच भावना लक्षात घेऊन पिटक फाऊंडेशनने बालदिनाचा हा उपक्रम राबविला. मुलांना आपण एकटे नसून समाजातील अनेक हात आपल्या मदतीसाठी आणि आनंदात सहभागी होण्यासाठी पुढे आहेत, याची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश होता.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका तसेच संपूर्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे बालदिनाचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण पार पडला. बालदिनाच्या निमित्ताने रुग्णालयातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि उपक्रमातील उत्स्फूर्त सहभाग हेच या आयोजनाचे खरे यश ठरले. समाजातील गरजू आणि उपचाराधीन बालकांपर्यंत प्रेम, माणुसकी आणि आनंद पोहोचविण्याचा पिटक फाऊंडेशनचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला. अशा सामाजिक उपक्रमांमुळे बालरुग्णांना मानसिक बळ मिळण्या सोबतच समाजात संवेदनशीलता आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते.






