– स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; नागपूरच्या आरोपीला बेड्या, १३.४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
हंसराज,भंडारा :- भंडारा शहरात अमली पदार्थांची विक्री करून तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शुक्रवारी भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्डात धाड टाकून १२ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ‘एम.डी.’ ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईत नागपूर येथील एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकूण १३ लाख ४७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे २०२६ रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरिष भालेराव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आंबेडकर वॉर्डातील समाज भवनाजवळ एका भाड्याच्या खोलीत अमली पदार्थांचा साठा करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथक तयार करण्यात आले.
पोलीस पथकाने आंबेडकर वॉर्डातील पुरुषोत्तम रामटेके यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या कपिल गंगाधर खोब्रागडे (रा. नंदनवन, नागपूर) याच्या घरावर छापा टाकला. या झडतीमध्ये पोलिसांना ६३.२१० ग्रॅम वजनाची ‘एम.डी.’ सदृश्य पावडर आढळली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत अंदाजे १२ लाख ६५ हजार रुपये आहे. यासोबतच ७९ हजार ९६० रुपयांची रोख रक्कम आणि ड्रग्स मोजण्याचे साहित्य असा एकूण १३ लाख ४७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी कपिल खोब्रागडे याच्याविरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) कलम ८ (क) आणि २२ (क) अन्वये पो. स्टे. भंडारा गु.र.क्र १०५७/२०२६ गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तस्करीचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरिष भालेराव, सपोनि केशव पुंजरवाड, पोलीस हवालदार रमेश बेडुरकर, राजेश पंचबुधे, प्रशांत कुरजेकर, अजय बारापात्रे, महिला पोलीस हवालदार किर्ती तिवारी, अंकेश पुराम, कृष्णाल कडू, योगेश दबाले आणि अमोल खरावे यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि केशव पुंजरवाड करत आहेत.