हंसराज, प्रतिनिधी भंडारा जवाहरनगर :- स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परसोडी येथील द्वारका नगरी कॉलनी मागील हटवार यांच्या खाली लेआऊटवर जवाहरनगर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या सात जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण ७९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार शिंगाडे व त्यांच्या पथकाने ही धाड टाकली. यावेळी रामप्रसाद रमेश भूरे (३७), अजित डिगांबर नागदेवे (२४), आशिष बबन रामटेके (३०), प्रतीक रामप्रसाद बर्वे (२२), प्रमोद मारोती जाधव (४०), राजेश मंगलनाथ सोलंकी (३०) आणि रामरतन निलकंठ मंडाले (३२, सर्व रा. परसोडी) हे जुगार खेळताना आढळले.
आरोपींकडून फळावरील व अंगझडतीतील १३,७८० रुपये रोख, ५२ ताशपत्ती, ८०,००० रुपये किमतीचे ५ मोबाईल आणि २५,००० रुपयांची एक बजाज डिस्कवर मोटारसायकल (एम.एच. ३०/ एस. ८७०८), असा एकूण ७९,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ६६/२०२६, कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. शिंगाडे आणि पो.हवा. हाके यांनी केली. पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहेत.