खापा :- आंबट शौकीन लोकांना मौजमजा करायला मिळावी म्हणून वाकी भागातील सुंदरवन रिसॉर्टवर देहव्यापार अड्डा सुरू झाला होता. याच अड्ड्याचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करीत दोन आरोपींना गजाआड केले. १) किष्णा कवडूजी भराडे (वय ५२वर्ष) रा. नारी वस्ती, तक्षशिला नगर, नागपूर व २) बाळा श्रीपत पाटील वय (५२वर्ष) रा. महादूला त. पारशिवनी जि. नागपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खापा पोलिस स्टेशन अंतर्गत वाकी येथे सुंदरवन रिर्सार्ट व लॉजिंग हॉटेल सुरू होते. या हॉटेलचा धंदा वाढावा म्हणून आरोपींनी काही महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होते.
दिवसेंदिवस येथील गर्दी वाढली होती. ही गर्दी अचानक एवढी वाढलीच कशी, असा प्रश्न काही चिंतातुरांना भेडसावत होता. म्हणून त्यांनी अधिक खोलात जाऊन पाहणी केली असता येथे देहव्यापार सुरू असल्याचे समोर आले. हा भयावह प्रकार समाजासाठी घातक असल्याने त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. गुप्त बातमीदाराद्वारे सर्व माहिती पक्की असल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांनी बोगस ग्राहक पाठविला. त्या ग्राहकाने या टोळीचा पर्दाफाश करीत खरोखरच ते देहव्यापार अड्डा चालवित असल्याचे स्पष्ट झाले. आपल्या आर्थिक लाभासाठी क्रिष्णा भराडे व बाळा पाटील यांनी महिलेला देहव्यापार करण्यास भाग पाडले होते. ही बाब समोर येताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने धाड टाकून दोन्ही आरोपींना अटक करून पीडित महिलेची सुटका केली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल, एमएच ४९ बीके १९१४ क्रमांकाची कार, रोख रक्कम आणि आक्षेपार्ह साहित्य असा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधिक्षक, ना.ग्रा. हर्ष ए पोद्दार व अपर पोलीस अधिक्षक, ना.ग्रा. अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष ना. ग्रा. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, मंगेश वानखेडे, मनोज मेंडुले, पन्नालाल बटाऊवाले, हर्षल धांडे, निलेश बर्डे, महिला पोलीस अंमलदार ज्योती वानखेडे, अर्चना कांबळे आणि अश्विनी वाघमारे यांनी केली. आरोपींच्या विरोधात खापा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.



