पीओपी बंदी हटवली; मूर्तिकारांचे भविष्य व पर्यावरणावर संकट

0
72

 

नागपूर २२ : गणेशोत्सवाला अजून महिन्याभराहून अधिक कालावधी असताना शहरातील पारंपरिक मूर्तिकार मातीच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त आहेत. पर्यावरणपूरक उत्सव साजरा व्हावा, अशी सर्वांचीच अपेक्षा असताना प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींच्या विक्रीला न्यायालयीन परवानगी मिळाल्यामुळे मूर्तिकारांमध्ये चिंता वाढली आहे.

महिन्याभरापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी मूर्ती बनवणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली. त्यामुळे पारंपरिक मातीच्या मूर्ती आणि पीओपी मूर्ती यामध्ये पुन्हा नव्याने संघर्ष निर्माण झाला आहे. मागील काही वर्षांपासून पारंपरिक मूर्तिकारांनी महापालिकेच्या सहकार्याने पीओपी मूर्तीविरोधात जनजागृती मोहिमा राबवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली होती आणि पीओपी मूर्ती विक्रीवर काही प्रमाणात नियंत्रण आले होते.

मात्र यंदा बंदी उठविल्यामुळे पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा दावा आहे की, या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठा झटका बसणार आहे.

नागपूरात पीओपी मूर्ती बनविल्या जात नसल्या, तरी अमरावती, अकोला येथून मोठ्या प्रमाणात अशा मूर्ती शहरात येतात. आकर्षक आणि स्वस्त असल्यामुळे अनेक भाविक अशा मूर्ती खरेदीला प्राधान्य देतात. न्यायालयाने आदेश दिला असला तरी पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलाशयांमध्येच करावे लागेल, असा अट घातली आहे. मात्र विक्री वाढल्यास पारंपरिक मूर्तिकारांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल, अशी त्यांची भावना आहे.

नागपूरातील चितारओळ, लालगंज कुंभारपुरा, पाचपावली, बुधवारी, बाळाभाऊपेठ, नवीन व जुनी मंगळवारी, मासूरकर चौक, पारडी, टिमकी, सिरसपेठ, नंदनवन, हंसापुरी, भानखेडा या वस्त्यांतील पारंपरिक मूर्तिकार सध्या जोमाने कामाला लागले आहेत. पिढ्यानपिढ्या मातीचे काम करणाऱ्या या कुटुंबांसाठी गणेशोत्सव हे वर्षभराच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे यंदा पीओपीचे “विघ्न” दूर व्हावे, अशी मनोमन प्रार्थना ते करत आहेत.