Friday, January 23, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निवडणुकीनंतरचे आत्मचिंतन..!

निवडणुकांनंतर काही पक्षांना आत्मचिंतन करावे लागते. इलाजच नसतो. जिंकणारे पक्ष साधारणत: हरलेल्या पार्टीला आत्मचिंतन करायला सांगतात. जे जिंकून येतात, त्यांना या प्रकाराची फारशी गरज नसते. आणि जे हरतात त्यांना या प्रकाराची सवय नसते. यामुळे लोकशाहीचे फार्फार नुकसान होते. राजकीय पक्षांचे आत्मचिंतन ही निव्वळ कविकल्पना आहे, असे कुणाला वाटेल. पण तसे नाही. काही पक्ष खरेच असे करतात, याचा अनुभव आम्हाला नुकताच आला. नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या. अनेक पक्षांवर आत्मचिंतन करण्याची पाळी आली. भारतीय कमळ पार्टी हा एकमेव सत्ताधारी पक्ष आहे की जो जिंकल्यावरही आत्मचिंतन करण्याचे सोडत नाही. हे या पक्षाचे वैशिष्ट्यच आहे. बघावे तेव्हा आत्मचिंतन करीत असतात. या पक्षासह अनेक पक्षाच्या नेत्यांना आम्ही आत्मचिंतनाचे काय केले? हा प्रश्न विचारला. प्रत्येक पक्षाच्या वतीने आम्हाला सविस्तर चिंतन सांगितले. यामुळे आपली लोकशाही कमालीची बळकट, प्रगल्भ आणि परिपक्व होत चाललेली आहे, हे आम्हाला कळून चुकले. या विविधरंगी आत्मचिंतनाचे अंश येथे देत आहो. जागेअभावी एकेका परिच्छेदात आत्मचिंतन संपवले, असा आरोप आमचेवर होऊ शकतो. पण राजकीय पक्षांनी एवढेच आत्मचिंतन केले, त्याला आम्ही तरी काय करणार? सविस्तर देत आहे :

कमळ पार्टी : आणखी एका नेत्रदीपक विजयानंतर आम्हाला आत्मचिंतन करणे भागच होते. एकाच पक्षाने सतत इतके विजय मिळवणे बरे नाही. ‘पंचायत से पार्लियामेंट तक’ सर्वत्र कमळेच कमळे उगवत असल्यामुळे काही विरोधकांच्या पोटात दुखते. ‘विजय हा ज्यांच्या डाव्या हाताचा मळ, तेच कमळ’ अशी नवी घोषणा सुचते आहे. विजयामागून विजय मिळवल्यामुळे विजयाचे व्यसन लागते, असे लोक म्हणतात. पण आम्हाला आत्मचिंतनाचे व्यसन लागले आहे.

शिंदेसेना : निवडणुकीनंतर आत्मचिंतनासाठी दिल्लीला जाऊन आलो. परम आदरणीय मोटाभाईंना भेटून बरेच आत्मचिंतन केले. दरे गावात आत्मचिंतन आश्रम उभा करतो आहे. तिथे भविष्यात वारंवार जावे लागेल, असे दिसते. बघू!

काँग्रेस : आत्मचिंतन? हे काय असतं?

घड्याळ पार्टी : हे बघा, निवडणुकीनंतर काय करावं, आत्मचिंतन करावं की आणखी काही करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरीच वर्षं मी हा शब्द आत्मसिंचन असाच ऐकत होतो, म्हणून त्या दिशेनं गेलोच नाही. एरवी आत्मचिंतन करतच असतो. इतके आत्मचिंतन केलं म्हणून आमची गाडी पुढे जाईना झाली! आता या भानगडीत पडायचं नाही असं ठरवलं आहे. मरु दे!

उबाठा : आम्हाला कोणी आत्मचिंतन शिकवण्याची गरज नाही. मर्दाची औलाद असाल तर स्वत:च आत्मचिंतन कराल! आम्हाला काय सांगता? आम्ही या कमळवाल्यांना एके काळी जवळ केलं नसतं, तर आज हे दिसलेही नसते!! गद्दारांनी आत्मचिंतन करावं, आम्हाला त्याची गरज नाही. हे असले प्रकार मराठी माणूस कधीही सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा!

मनसेना : आत्मचिंतन करण्यात वेळ घालवल्यामुळेच आमचा पक्ष इथवर पोचला आहे. थोडे तरी नगरसेवक निवडून यावेत म्हणून आम्ही वेळोवेळी आत्मचिंतन केले. काही वेळेला ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत एका पक्षाला धारेवर धरले, आत्मचिंतनानंतर त्याच पक्षाला बिनशर्ट पाठिंबा दिला. ज्यांच्याबरोबर वैर धरले, त्यांच्याशीच मनोमिलन केले. काय नाही केले? पण आत्मचिंतन केल्यामुळे मते मिळत नाहीत, असे आता लक्षात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com