– पावसामुळे रस्त्याची दुरवस्था, सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
हंसराज,भंडारा :- राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी पासून जाख ते गुंजेपार या दरम्यानच्या रस्त्यावर पावसाने मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक वारंवार घसरून पडत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्याने प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून चिखलामुळे रस्ता निसरडा झाला आहे.यामुळे दुचाकी आणि इतर वाहने घसरून पडण्याचे प्रकार रोजच घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या खराब रस्त्यामुळे येण्या-जाणाऱ्या लोकांना शारीरिक इजा होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. विशेषतः शाळेत जाणारी मुले, कामावर जाणारे नागरिक आणि रुग्णांना या रस्त्यावरून जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रस्त्याकडे संबंधित प्रशासकीय विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ हाती न घेतल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन खड्डे बुजवण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी मुजबी, जाख आणि गुंजेपार परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.




