– संघटनात्मक एकजुटीचे दर्शन; सभासदांना ४ टक्के लाभांश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
संदीप कांबळे, कामठी :- नगरपरिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कामठीची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कामठीच्या नवीन कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतानाच सभासदांच्या हिताचे संरक्षण, संस्थेची आर्थिक शिस्त आणि भविष्यातील संघटनात्मक बळकटी यावर सभेत विशेष भर देण्यात आला.
सभेत सन २०२४-२५ मधील प्रस्तावांना मंजुरी, सन २०२५-२६ च्या जमाखर्च, नफा-तोटा व ताळेबंद पत्रकास मंजुरी, नफा विभाजनास मंजुरी तसेच सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सन २०२५-२६ करिता प्राप्त झालेल्या दोषपत्रातील त्रुटींची दुरुस्ती करणे, लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने मांडण्यात आलेल्या विषयांवरही सभासदांनी चर्चा केली. विविध विषयांवर झालेल्या चर्चेत संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका व्यक्त करण्यात आली.सभेतील सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे संस्थेच्या सभासदांना ४ टक्के लाभांश देण्याचे निश्चित करण्यात आले. सभासदांच्या आर्थिक हिताशी थेट संबंधित असलेल्या या निर्णयामुळे संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
या आमसभेच्या निमित्ताने संस्थेच्या कार्यपद्धतीला अधिक सक्षम करण्यासाठी सभासदांची एकजूट आणि परस्पर सहकार्य आवश्यक असल्याचे वातावरण निर्माण झाले. संस्थेच्या प्रगतीत प्रत्येक सभासदाची भूमिका महत्त्वाची असून, सामूहिक निर्णयप्रक्रियेतून संस्था अधिक भक्कम करण्याचा संदेश या सभेतून देण्यात आला.
यावेळी रंजीत माटे, गणेश तलमले, अनिल डोंगरे, सोहेल खान, दीपक जयस्वाल, विक्रम ढिकुनवार, रमा गजभिये, संतोष मिश्रा, गंगाधर मेहर, रुपेश जयस्वाल यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
सभेचे आभार प्रदर्शन रुपेश जयस्वाल यांनी केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप भोकरे यांनी सभाचे समापन झाल्याचे जाहिर झाले.


