spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खासगी ट्रॅव्हल्सला शहरात बंदी, पोलिस प्रशासनाचे अभिनंदन : आ. संदीप जोशी

नागपूर :- शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने खासगी ट्रॅव्हल्सची नागपूर शहरात एन्ट्री बंद करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, या निर्णयाचे आपण स्वागत करतो, असे आमदार संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

नागपूर शहरातून दररोज शेकडो प्रवासी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, हैदराबाद, रायपूर, जबलपूर या शहरांकडे रवाना होतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी ट्रॅव्हल्स शहरातून धावतात. मात्र संध्याकाळच्या वेळी शाळा व कार्यालय सुटण्याची वेळ आणि या ट्रॅव्हल्सच्या सुटण्याची वेळ एकच असल्याने वाहतूक कोंडी गंभीर स्वरूप धारण करत होती. दुपारी ३ वाजल्यापासून रात्री १०-११ वाजेपर्यंत शहरातून बाहेर जाणाऱ्या बस, तर सकाळी इतर शहरांतून येणाऱ्या बस दुपारी १२ पर्यंत शहरात येत असल्याने वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

या बस प्रवाशांसाठी रस्त्यातच उभ्या राहत असल्याने अपघाताचा धोका व वाहतूक ठप्प होण्याची समस्या अधिक वाढत होती. याविरोधात नागरिक व विविध संघटनांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत खासगी ट्रॅव्हल्सची शहरात एन्ट्री बंद केली आहे.

या निर्णयाचे स्वागत करताना आमदार संदीप जोशी म्हणाले की, शहरवासीयांचा दीर्घकाळचा प्रश्न पोलिसांनी मार्गी लावला आहे. हा निर्णय कौतुकास्पद असून नागपूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, महापौरपदाच्या कार्यकाळातच संदीप जोशी यांनी सर्व खासगी ट्रॅव्हल्स शहराबाहेर थांबविण्याचा ठराव महानगरपालिकेत आणला होता. मात्र तो त्यावेळी काही कारणांमुळे बारगळला होता. आज पोलिसांनी त्याच विचाराला प्रत्यक्षात उतरविल्याबद्दल आमदार जोशींनी पोलिस प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.

वाढती लोकसंख्या, वाढती वाहने आणि खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी यामुळे रहदारीच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत होत्या. पोलिस प्रशासनाने घेतलेला हा निर्णय योग्य वेळी आणि लोकहिताचा ठरला असल्याचेही आ. जोशी यांनी म्हटले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.