– १४ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची मागणी; निर्णय न झाल्यास १५ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलनाचा मिशन बहुजनचा इशारा
नागपूर :- दीक्षाभूमीच्या वाढत्या गरजा आणि दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे येणाऱ्या लाखो अनुयायांची संख्या लक्षात घेता, मौजा लेंड्रा – काचिपुरा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ताब्यातील सुमारे ५२ एकर जमीन दीक्षाभूमीच्या सर्वांगीण व नियोजनबद्ध विकासासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मिशन बहुजनच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात मिशन बहुजनचे अध्यक्ष राकेश धारगावे यांच्या स्वाक्षरीचे अंतिम निवेदन बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर विभागाचे विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे दीक्षाभूमीला ऐतिहासिक, सामाजिक आणि धम्माच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी नागपुरात दाखल होतात. यामुळे पार्किंग, वाहतूक, निवास, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा तसेच इतर मूलभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीचा भविष्यातील वाढता विस्तार आणि अनुयायांच्या सुविधांचा विचार करून अतिरिक्त जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मिशन बहुजनने निवेदनात नमूद केले आहे.
५२ एकर जमिनीवर नियोजनबद्ध विकासाची मागणी
मिशन बहुजनने काचिपुरा, मौजा लेंड्रा येथील सुमारे ५२ एकर जमीन दीक्षाभूमीच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या जागेचा उपयोग केवळ तात्पुरत्या व्यवस्थेसाठी न करता दीर्घकालीन विकास आराखड्या नुसार करण्यात यावा, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. या विकास आराखड्यात पार्किंग व्यवस्था, अनुयायांसाठी निवास सुविधा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक सुविधांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. १४ ऑक्टोबर पर्यंत लेखी निर्णयाची मागणी मिशन बहुजनने शासनाला १४ ऑक्टोबर २०२६, अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत या मागणीवर स्पष्ट व लेखी निर्णय अथवा ठोस लेखी आश्वासन देण्याची मुदत दिली आहे. शासनाकडून या कालावधीत निर्णय किंवा लेखी आश्वासन न मिळाल्यास १५ ऑक्टोबर २०२६ पासून दीक्षाभूमी परिसर अथवा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे बेमुदत साखळी उपोषण व आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. हे आंदोलन लोकशाही व शांततामय मार्गाने करण्यात येणार असल्याचेही मिशन बहुजनने स्पष्ट केले आहे. दीक्षाभूमीचे ऐतिहासिक महत्त्व, येथे दरवर्षी येणाऱ्या लाखो अनुयायांची संख्या आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शासनाने ५२ एकर जमिनीच्या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन मिशन बहुजनचे अध्यक्ष राकेश धारगावे यांनी केले आहे.








