फादर अग्नल शाळेच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी १ मे रोजी जनआंदोलन; माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात स्वराज्य फाउंडेशनचा एल्गार

0
61

हंसराज, भंडारा तुमसर :- मौजा तुडका येथील फादर अग्नल शाळेच्या अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश असतानाही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या दिरंगाईच्या निषेधार्थ स्वराज्य युवा एकता फाउंडेशनने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या ४८ तासांत अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिनी’ महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात भव्य जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे? फादर अग्नल शाळेचे बांधकाम अनधिकृत असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच मान्य केले आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले असूनही स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे. १७ एप्रिल रोजी सात दिवसांचा ‘अल्टिमेटम’ देऊनही कोणतीही हालचाल न झाल्याने आता थेट आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सावन कुमार, आणि पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना पाठवण्यात आले आहे.

तहसीलदार उपेश अंबादे यांना प्रत्यक्ष निवेदन देताना स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तालुकाध्यक्ष राजेंद्र तुरकर, कामगार सेल जिल्हाध्यक्ष महादेव बुरडे, मुकेश वाघमारे, योगेश रंगवानी, हेमंत बांते आदी उपस्थित होते.

या प्रकरणात महसूल विभाग आणि शिक्षण विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र आहे. तहसीलदारांनी हे प्रकरण शिक्षण विभागाकडे सोपवले आहे, तर शिक्षण विभागाने सखोल चौकशीसाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. या “पत्रव्यवहाराच्या खेळात” मूळ कारवाई मात्र प्रलंबित आहे.

“आम्ही वारंवार निवेदने देऊन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र,प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. १ मे रोजी होणाऱ्या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनाची राहील.” — अमित मेश्राम, (अध्यक्ष, स्वराज्य युवा एकता फाउंडेशन, तुमसर)

“फादर अग्नल शाळेबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. हे प्रकरण शिक्षण विभागाशी संबंधित असल्याने शिक्षणाधिकारी भंडारा आणि जिल्हा परिषद प्रशासनाला पुढील कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आले आहे.”

— उपेश अंबादे, (तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी, तुमसर)

“शाळेच्या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती तुमसर यांना दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील पावले उचलली जातील.”

— मनिषा गजभिये, (शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद भंडारा)