लोकशाहीर सदाशिवराव नारनवरे यांच्या जीवनावर आधारित “सदानंद म्हणे…..” पुस्तकाचे प्रकाशन

0
137

– शाहिरी, कलापथक आणि भजनातून समाजात बदल घडवणाऱ्या लोकशाहीर नारनवरे यांना वाहिली काव्यमय श्रद्धांजली

कामठी :- सदाशिवराव नारनवरे या लोकशाहीर, प्रबोधनकार, शाहीर आणि कवीने आपल्या शाहिरी, कवित्व आणि सामाजिक कार्यातून ग्रामीण भागातील जनसामान्यांना अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार, भेदभाव आणि अनिष्ट कुप्रथांविरुद्ध जागरूक करणारी चळवळ उभी केली. त्यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त आदर्श कवी मंडळ नागपूर व सदानंद भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चनकापूर येथील खापरखेडा परिसरात असलेल्या आदर्श धम्म प्रचारक केंद्र येथे भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भंते नाग दीपंकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “आंबेडकरी चळवळीतून जनजागृतीचे व सामाजिक परिवर्तनाचे कार्य उभे करणारे सदाशिवराव नारनवरे हे खरे अर्थाने प्रबोधनकार होते. त्यांनी भजन मंडळांच्या शाखा गावागावात स्थापन करून समाजमनाला जागं केलं.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र बोरकर (अध्यक्ष, आदर्श कवी मंडळ) होते. या वेळी माजी अध्यक्ष सुधाकर पाटील, रामदास तागडे, प्रकाश लांजेवार, सचिव सविता नारनवरे, विजय उके, मिलिंद पाटील, भाऊराव गोंडोळे, मनोहर जामगडे आदी मान्यवरांसह कवी, गायक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी धम्मध्वजारोहण व बुद्धवंदना करण्यात आली. यावेळी सदाशिवराव नारनवरे यांचे पुत्र बंडू नारनवरे यांनी संपादित केलेल्या सदानंद म्हणे……. या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन भंते नाग दीपंकर महास्थवीर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून नारनवरे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांना आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमात उपस्थित सर्व कवी व गायकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. समारोपाला सदानंद भजन मंडळाच्या विविध गावातील शाखांनी तसेच महिला भजन मंडळानी भजन गायन सादर करून लोकशाहीर सदाशिवराव नारनवरे यांना आपली श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश ढोके, संचालन महिपाल मडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार कैलास सहारे यांनी मानले.

या वेळी पुंडलिक मेश्राम, दिवाकर पौनीकर, गणपत पौनिकर, केशव शेंडे, रामा पाटील, डोमाजीं रामटेके, जिज्ञेश रामटेके, नरेश पौनिकर, अरुण पाटील, बंडू पौनिकर, नानक रामटेके, भीमराव शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.