यवतमाळ :- जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील गुणवान खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांचा शोध, घडण व घडवणूक करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला खेळुया’ या अभिनव क्रीडा अभियानाचा भव्य प्रारंभ करण्यात आला आहे. हे अभियान केवळ क्रीडा स्पर्धांपुरते मर्यादित नसून जिल्ह्यातील लपलेली क्रीडा प्रतिभा शोधणे (टॅलेंट सर्च) हा त्याचा मुख्य उद्देश आहे.
या अभियानांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय, तर्कशुद्ध व तांत्रिक पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या सर्वांगीण क्रीडा विकासावर भर देण्यात येणार आहे. खेळाडूंचा सध्याचा क्रीडा स्तर विचारात न घेता, योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यातील गुणवत्ता, कौशल्य व क्षमता अधिक विकसित करण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर दि. २० व २१ जानेवारी रोजी गटनिहाय १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धा व निवड चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत. या चाचण्यांमधून निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
या निवड चाचण्यांमध्ये सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी तसेच शाळाबाह्य विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याचे क्रीडा संयोजक, तालुका क्रीडा अधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.








