spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पावसाने डोळे वटारले; नवेगावबांध परिसरातील रोवणी खोळंबली

– धान पऱ्यांतील कोंब वाळू लागले; दुबार पेरणीचे संकट गडद, शेतकरी हवालदिल

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगावबांध :- जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने नवेगावबांध परिसरातील शेतीवर मोठे संकट ओढवले आहे. रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून धान पऱ्यांतील कोवळे कोंब वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे.

सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी वेळेवर धान पऱ्यांची पेरणी केली, तर अनेकांनी सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी उरकली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने पऱ्यांतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, धानाचे कोवळे कोंब करपू लागले असून शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

शेतांमध्ये पाण्याचा पुरेसा साठा नसल्याने रोवणीची कामे थांबली आहेत. आधीच बियाणे, खते, नांगरणी व मजुरीवर मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा अतिरिक्त खर्चाचे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे, शेतीची कामे बंद पडल्याने शेतमजुरांवरही बेरोजगारीची वेळ आली असून ग्रामीण अर्थचक्रावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत.

स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, पुढील दोन-तीन दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळेवर रोवणी न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, दमदार पावसाची सर्वजण आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

प्रतिक्रिया

“सुरुवातीला झालेल्या पावसामुळे धानाच्या पऱ्यांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पाऊसच गायब झाला. पऱ्यांतील कोंब वाळू लागले आहेत. लवकर दमदार पाऊस झाला नाही तर दुबार पेरणी करावी लागेल. त्यामुळे खर्च वाढणार असून मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे.”

– सुभाष परशुरामकर, शेतकरी, नवेगावबांध

“रोवणीसाठी शेत तयार आहे; पण पावसाअभावी कामे पूर्णपणे थांबली आहेत. वेळेवर पाऊस न झाल्यास रोवणी उशिरा होईल आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होईल. आता सर्व आशा पावसावरच आहेत.”

– जितेंद्र कापगते, शेतकरी, नवेगावबांध


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.